प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे साखर कारखान्यावर अडकून पडलेल्या राज्यातील ऊस तोडणी मजुरांना मूळ गावाकडे पाठवण्याचा निणर्य शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. काही अटी घालून त्यांना गावाकडे पाठवण्यात यावे असे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हय़ातील 7 कारखान्यांच्या कार्यस्थळवर पालात रहात असलेल्या 14 हजार 239 ऊस तोड मजुरांना दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी दुपारपासून त्यांची पाठवणीही सुरु झाली आहे.
साखर कारखाने बंदनंतर उस तोडणी मजुरांना सध्या रहात असलेल्या ठिकाणीच क्वारंटाईन करण्यात यावे, त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येऊ नये, असे आदेश विभागीय साखर आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यामुळे जिल्हय़ात वास्तव्यास असलेल्या परजिल्हय़ातील 20 हजार ऊस तोडणी मजुरांना 1 एप्रिलाला कारखान्यावरच कॉरंटाईन करण्यात आले होते. या कामगारांची आरोग्य तपासाणी, त्यांना आवश्यक पाणी, जीवनावश्यक वस्तू, धान्याचा पुरवठा आदी सुविधा कारखान्यां मार्फत करण्यात आली होती. आम्हाला विनाकारण कोंडून ठेवण्यात आले आहे. आमचा आणि कोरोनाचा काहीही संबध नाही. झोपडी ते उसाचा फड असाच आमचा प्रवास आहे. त्यामुळे आम्हाला गावाकडे जावू द्या अशी मागणी कामगारांतून होत होती. दरम्यानच्या काळात काही मजुरांनी पोलिसांची नजर चुकवून गावं गाठली आहेत. आता या निर्णयामुळे उर्वरित कामगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुरु असलेलेकारखाने व कामगारांची संख्या
जवाहर हुपरी 4349
गुरदत्त टाकळी 4202
दत्त शिरोळ 3897
शरद 938
पंचगंगा 385
बिद्री 275
दालमिया 193
एकुण 14239
नियमांचे पालन करीत कामगारांना सोडणार
कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याचा निर्णय झाल्याने पुढील प्रक्रिया सुरु केली आहे. कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी करुन सुरक्षितपणे त्यांना गावी पोहच करण्याची सूचना कारखान्यांना दिल्या आहेत.
अरुण काकडे, प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर