पैरा पद्धतीने काम करण्याची गरज
नंदु कुलकर्णी/आळते
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहे. उसाची वाढ पूर्ण क्षमतेने झाली आहे. पण ऊसतोड कामगारांची मनमानी, त्यांची अव्वाच्या- सव्वा एन्ट्री, चालकाला प्रत्येक खेपेला द्यावी लागणारी खुशाली, ऊस तोडणी कामगारांच्या अपुऱया यंत्रणेमुळे शेती विभागाकडे दररोज मारावे लागणारे हेलपाटे, त्यांची करावी लागणारी मनधरणी यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे.
उसाची पूर्ण वाढ होऊन सुद्धा उशिरा तोडणीमुळे ऊसाला तुरे येऊन वजन घटत आहे. अवकाळी पावसामुळे ऊस भुईसपाट झाल्याने ऊसाच्या मुळÎा कुजल्या आहेत. या कारणास्तव शेतकऱयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. भविष्यकाळात अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱयांच्या रागाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. असे साखर कारखान्याच्या शेती विभागातील अधिकाऱयांकडून बोलले जात आहे.
मागील वषीची व चालू हंगामाची सरासरी पाहता सध्या उस गाळपास गती येणे गरजेचे आहे. त्याकरिता कारखान्याचे शेती विभाग, चेअरमन व संचालक मंडळाची धावपळ सुरू आहे. मात्र ऊसतोडणी कामगार व वाहन मालकांचा यामध्ये सहभाग मनापासून दिसत नाही. यातच ऊसतोड कामगार उत्पादक शेतकऱयांना लुबाडण्याचे प्रकार करीत आहेत. ऊसतोड कामगार व वाहन ड्रायव्हर शेतकऱयांच्याकडुन भरमसाठ रक्कम उकळत असून हजाराच्या पटीत मागणी करीत आहेत. एकरी तोडणीसाठी जवळपास चार ते पाच हजार रुपये खर्च येत आहे. याचबरोबर अतिपाऊस व अवकाळी पावसाने ऊस भुईसपाट झाला आहे. तो उस तोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकऱयाच्यावर स्व:ताचा ऊस स्वतः तोडून पाठविण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
`पैरा’ पद्धत पुन्हा येण्याची शक्यता …..
अनेक वर्षापासून शेतकरी ‘पैरा’ पद्धतीने काम करीत असतात. दहा ते पंधरा पेक्षा अधिक शेतकरी एकत्र येऊन एकमेकांच्या शेतात सर्वजण कामाला जाऊन शेतातील कामे करण्याची पद्धत होती. कित्येक वर्षापूर्वी ही पद्धत शिरोळ व हातकणंगले तालुक्मयात पूर्णपणे बंद झाली असून कागल व करवीर तालुक्मयाच्या पूर्वभाग वगळता जिह्यातील अन्य तालुक्मयात अद्याप ‘पैरा’ पद्धत आहे. यामुळे हातकणंगले व शिरोळ तालुका वगळता अन्य तालुक्मयात ऊसतोडीची ‘पैरा’ पद्धत सुरू होण्याची शक्मयता आहे.
चालू गळीत हंगाम फक्त पंचवीस ते तीस दिवस पुढे जाणार आहे, म्हणजेच एक ते दोन एप्रिलपर्यंत सर्वच कारखान्यांची सांगता होईल. तरी कोल्हापूर व सांगली जिह्यातील कोणत्याही शेतकऱयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. संयम ठेवावा. तोडणी कामगारांना जादा पैसे देऊन ऊस पाठविण्याचा प्रयत्न करू नये. तोडणी कामगार, वाहनमालक, शेतकरी, शेती अधिकारी, कर्मचारी व कारखान्याचे संचालक मंडळ यांनी एकमेकांच्या विचाराने एकमेकांना समजून कामकाज केल्यास कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. – सुधाकर पाटील वरिष्ठ शेती अधिकारी









