कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून सहज विजय, रसेलची 31 चेंडूत 2 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 70 धावांची आतषबाजी
मुंबई / वृत्तसंस्था
सामनावीर उमेश यादवचे 4 बळी व आंद्रे रसेलच्या नाबाद अर्धशतकामुळे कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सचा आयपीएल साखळी सामन्यात 6 गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव 18.2 षटकात 137 धावांमध्ये खुर्दा झाला तर प्रत्युत्तरात केकेआरने 14.3 षटकात 4 बाद 141 धावांसह सहजपणे विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 138 धावांचे आव्हान असताना आंद्रे रसेलने 31 चेंडूत 2 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 70 धावांची धुवांधार खेळी साकारली. वास्तविक, केकेआरचा संघ एकवेळ 7 षटकात 4 बाद 51 अशा बिकट स्थितीत होता. पण, याचवेळी रसेल व सॅम बिलिंग्ज (नाबाद 24) ही जोडी क्रीझवर एकत्रित आली आणि त्यांनी 7.3 षटकात 90 धावांची अभेद्य भागीदारी साकारत सहज विजय संपादन करुन दिला.
पंजाबची फलंदाजीत हाराकिरी
प्रारंभी, उमेश यादवने नव्या चेंडूवर भेदक मारा साकारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्सचा 137 धावांमध्ये धुव्वा उडवला. दुसऱया डावादरम्यान डय़ू फॅक्टर राहत असल्याने नाणेफेक जिंकणाऱया संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारणे हा ट्रेंड झाला आहे आणि केकेआर कर्णधार श्रेयस अय्यरचा निर्णय देखील याला अपवाद नव्हता.
आपल्या सलामी लढतीत 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱया पंजाबने येथे पॉवर प्लेच्या 6 षटकात 3 बाद 62 धावा केल्या. अनुभवी जलद गोलंदाज उमेश यादवने 4 षटकांचा कोटा पूर्ण करत 23 धावात 4 बळी घेतले. मागील 2 हंगामात केवळ दोनच सामने खेळणाऱया उमेश यादवची ही गोलंदाजी त्याच्या टीकाकारांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली.
उमेशने प्रतिस्पर्धी कर्णधार मयांक अगरवालला पहिल्याच षटकात पायचीत करत पहिला धक्का दिला. श्रीलंकन भानुका राजपक्षने अवघ्या 9 चेंडूत 31 धावांची खेळी साकारत येथे उत्तम फटकेबाजी केली. त्याने विशेषतः मिडविकेटच्या दिशेने अधिक भर देत 3 चौकार व 3 षटकार फटकावले.
पंजाब किंग्सच्या डावात फक्त राजपक्षची कामगिरी लक्षवेधी ठरली. अय्यरने नेतृत्वात चमक दाखवताना गोलंदाजीत कल्पक बदल राबवले. 15 व्या षटकात स्लीपला क्षेत्ररक्षण लावण्याची त्याची रणनीती राहुल चहरचा बळी घेऊन गेली. त्याचा नव्या चेंडूवरील सहकारी टीम साऊदी व केकेआरचे रिटेन केलेले फिरकीपटू वरुण चक्रवर्ती व सुनील नरेन पंजाबच्या फलंदाजांवर बरेच भारी पडले.
लियाम लिव्हिंगस्टोन (16 चेंडूत 19) आश्वासक प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरला तर भारताचा यू-19 स्टार खेळाडू राज अंगद बावाला सलग दुसऱयांदा सूर सापडला नाही. या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱया कॅगिसो रबाडाने 16 चेंडूत 25 धावांचे योगदान देत संघाला 140 च्या उंबरठय़ापर्यंत नेले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स ः 18.2 षटकात सर्वबाद 137 (भानुका राजपक्ष 9 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 31, कॅगिसो रबाडा 16 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 25, लियाम लिव्हिंगस्टोन 16 चेंडूत 19, शिखर धवन 16. अवांतर 11. उमेश यादव 4 षटकात 4-23, टीम साऊदी 2-36, मावी, सुनील नरेन, आंद्रे रसेल प्रत्येकी 1 बळी).
कोलकाता नाईट रायडर्स ः 14.3 षटकात 4 बाद 141 (आंद्रे रसेल 31 चेंडूत 2 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 70, सॅम बिलिंग्ज 23 चेंडूत नाबाद 24, श्रेयस अय्यर 15 चेंडूत 5 चौकारांसह 26, अजिंक्य रहाणे 12. अवांतर 6. राहुल चहर 2-13, रबाडा, स्मिथ प्रत्येकी 1 बळी).









