चौदपदी महामार्गावरील वाहतुक खोळंबली
वार्ताहर /झुआरीनगर
उपासनगरातील प्रमुख नाक्यावर कोळसावाहू ट्रक एका दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कलंडला. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.
जीए-01-डब्ल्यू-7250 हा टिपर ट्रक कोळसा घेऊन वेर्णाच्या दिशेने जात असताना उपासनगरातील नाक्यावर अचानक एक दुचाकीचालक समोर आल्याने चालकाने ब्रेक लावला व गाडी उजव्या बाजुने वळविण्याच्या प्रयत्नात टिपर ट्रक एका बाजुने आडवा झाला. यावेळी ट्रकमधिल कोळसा रस्त्यावर विखुरला गेला. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी चालकाला ट्रकच्या केबीनमधून बाहेर काढले. त्याला किरकोळ दुखापत झाली. या महामार्गावर सतत वाहने सुसाट वेगाने धावत असतात. परंतु यावेळी मार्गावर वाहने नसल्याने अनर्थ टळला. ज्या ठिकाणी हा अपघात घडला तिथे बसच्या प्रतिक्षेत प्रवासीही थांबलेले असतात. उपासनगरातील या नाक्यावर सतत लहान मोठे अपघात होतच असतात. उपासनगर व इतर भागातील लोकांना जीव मुठीत धरूनच हा मार्ग ओलांडावा लागतो. या ठिकाणी घडणाऱया वाढत्या अपघाताची दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









