नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्किलिंग ओपन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन व वेस्ले सो यांनी विजयी सलामी दिली. कार्लसनने ग्रँडमास्टर नेपोम्नियाचीला कठीण स्थितीतून मार्गोत्क्रमण करत मात दिली तर आणखी एका लढतीत वेस्ले सोने हिकारु नाकामुराला पराभवाचा धक्का दिला. वेस्लेने अतिशय रचनात्मक खेळ साकारला आणि मला पटावर वर्चस्व गाजवण्याचे इरादे सफल करता आले नाहीत, असे नाकामुरा येथे म्हणाला.
नेपोम्नियाचीविरुद्ध कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागलेल्या कार्लसनने पहिल्या फेरीत अनिश गिरीविरुद्ध झगडावे लागले होते, त्या आठवणीला येथे उजाळा दिला. ही स्पर्धा दि. 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून 16 खेळाडूंमधील प्राथमिक फेरी राऊंड रॉबिन पद्धतीने चालली होती. 8 अव्वल खेळाडूंनी 6 दिवस चालणाऱया बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर ही स्पर्धा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली आहे.









