वृत्तसंस्था/ कोलकाता
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून देशात उन्हाळय़ाचे आगमन झाले असून सिलिंग फॅन्स आणि टेबल फॅन्सच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत आहे. उषा इंटरनॅशनल या भारतातील एका मोठय़ा कंपनीच्या म्हणण्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत फॅन्सच्या मागणीत 20 टक्के वाढ झाली आहे. पंख्यांच्या रचनेमध्येही सुधारणा होत असून कमी वीज वापरणारे ध्वनीरहित पंखे ग्राहकांच्या पसंतीला विशेषत्वाने उतरत आहेत, असे दिसून येत आहे.
शहरी भागांपेक्षाही ग्रामीण भागात पंख्यांना अधिक मागणी आहे. कोरोना लॉकडाऊन काळात लक्षावधी स्थलांतरित कामगारांनी आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. यापैकी अनेक जण अद्यापही गावातच आहेत. त्यांनी त्यांच्या घरांमध्ये पंख्याची सोय करून घेतल्याने ग्रामीण भागात फॅनविक्री वाढत आहे. येत्या सहा महिन्यात पावसाळय़ाचे दिवस वगळता पंख्यांच्या मागणीमध्ये अशीच वाढ होत राहील, असे अनेक कंपन्यांना वाटत असून त्याप्रमाणे त्यांनी उत्पादन वाढीच्या योजना हाती घेण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे बँकांकडून होणाऱया कर्जाची उचलही अधिक प्रमाणात होईल, असे समजते.









