लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजन : यावषी बक्षिसांच्या संख्येत वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधील कार्यक्रमांची संख्या वाढत असताना लोकमान्य सोसायटी आयोजित ‘उन्नती 2020 एक पाऊल प्रगतीकडे’ या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली असून महिलावर्गाचे लक्ष 8 फेब्रुवारीकडे लागले आहे. गतवर्षी या कार्यक्रमाला मिळालेला महिलांचा प्रतिसाद लक्षात घेऊन यावषी बक्षिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून या कार्यक्रमात बक्षिसांची लयलूट होणार आहे. दि. 8 रोजी मराठा मंदिर येथे दुपारी 4 ते 8 यावेळेत उन्नती कार्यक्रम होणार आहे.
पहिली विजेती स्पर्धक महिला म्हणजेच उन्नती गृहलक्ष्मी ही पैठणीची मानकरी ठरणार आहे. त्या शिवाय दुसऱया व तिसऱया क्रमांकांच्या विजेत्या महिलांनाही बक्षिसादाखल साडी देण्यात येणार आहे. याशिवाय काही खास बक्षिसे काढण्यात येणार आहेत. शेवटच्या फेरीत म्हणजेच उन्नती गृहलक्ष्मीच्या फेरीमध्ये ज्या दहा महिला सहभागी होतील, त्यापैकी पहिल्या तीन विजेत्यांना साडीचा मान मिळणार आहे. मात्र अन्य सात जणींनाही त्यांचे स्वयंपाक घरातील काम सोपे करेल, असे खास बक्षीस देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला कोणती अभिनेत्री येणार याचे कुतूहल महिलावर्गात आहेच. शिवाय त्यांना बचतीची, गुंतवणुकीची व स्वावलंबनाची किती गरज आहे हे सांगण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन महिलांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. गतवषी मिळालेला प्रतिसाद व जागेअभावी अनेक महिलांना माघारी जावे लागले. हे लक्षात घेऊन यावषी मराठा मंदिरच्या भव्य सभागृहात ‘उन्नती गृहलक्ष्मी’चे आयोजन करण्यात आले आहे. शेजारील सभागृहसुद्धा महिलांसाठी खुले करण्यात येणार आहे. याशिवाय महिलांची निराशा टाळण्यासाठी भव्य स्क्रीन बसविण्यात येणार आहे. महिलांनी कार्यक्रमाला नियोजित वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमान्य सोसायटीने केले आहे.









