बेळगावमध्ये एन 95 मास्कची निर्मिती : उद्योजक दयानंद नेतलकर यांचा उद्योग ठरतोय सामान्य जनतेच्या हिताचा
सुशांत कुरंगी / बेळगाव
उद्योग हा आर्थिक समृद्धी आणि विकासाचा मार्ग असला तरी त्यातून सामाजिकता जोपासण्याचा उद्देश बाळगला की कौतुक होतेच. प्रतिकुल परिस्थितीत आवश्यक वस्तू कमी खर्चात आणि उत्तम दर्जामध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश ठेवून राबविलेला उद्योग आराखडा असाच प्रशंसेचा विषय ठरतोय. बेळगावचे उद्योजक दयानंद गणपती नेतलकर यांनी सध्याच्या कोरोना काळात सुरू केलेला एन 95 मास्क निर्मितीचा उद्योग असाच देशभरातील सामान्य जनतेच्या हिताचा ठरलाय.
कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद पडले. मास्क, सॅनिटायझर तयार करणाऱया कंपन्या मोठी किंमत आकारून हे साहित्य बाजारात आणत होत्या. परंतु या काळात बेळगावमधील उद्योजक दयानंद नेतलकर यांनी ग्राहकांना अत्यल्प दरात एन 95 मास्क उपलब्ध करून दिले आहेत. आज त्यांचे मास्क महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात विक्री होत असून कोरोना रोखण्यात त्यांचाही खारीचा वाटा आहे.
मास्कची वैशिष्टय़े काय?
कोरोना विषाणूंना 95 टक्के प्रतिकार करू शकतो, अशा मास्कला एन 95 मास्क म्हणून ओळखले जाते. या मास्कमध्ये कापडाचे 5 थर देण्यात आलेले आहेत. पहिला 60 जीएसएमचा कापड, दुसरा मेल्ट ब्लो कापड, तिसरा हॉट एअर कापड, त्यानंतर पुन्हा मेल्ट ब्लो कापड व शेवटी स्पन लेअर देण्यात आलेले असते. हा वन टाईम युज मास्क असून धुवून पुन्हा वापरता येत नाही.
तीन प्रकारच्या मास्कची निर्मिती
श्रीनिवास वेलनेस कंपनी एन 95 मास्क सोबतच वैद्यकीय सेवेसाठी वापरण्यात येणारा थ्री प्लाय सर्जिकल मास्कची निर्मिती करते. याशिवाय सलूनमध्ये गेल्यावर केस कापताना रेग्यूलर मास्क वापरता येत नाही. त्यासाठी तोंडाला चिकटेल असा मास्क तयार केला आहे. त्याला वैद्यकीय क्षेत्रातील चिकटपट्टी लावण्यात आली असून काम झाल्यानंतर तो काढून टाकता येतो.
दीड महिन्यात उभारला कारखाना
उद्यमबाग डच इंडस्ट्री येथे कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक मशीन राजकोट तर दुसरी बेंगळूर येथून मागविली. दयानंद नेतलकर यांच्या पत्नी व श्रीनिवास वेलनेस कंपनीच्या संचालिका छाया नेतलकर व कन्या शिवानी यांनी मेहनत घेतली. जिल्हा औद्योगिक केंद्र व सीडॉक या संस्थांनी मदत केल्यामुळे लॉकडाऊनमध्येही कारखाना अवघ्या दीड महिन्यात उभा राहिला.
शंकरगौडा पाटीलांकडून अभिनंदन
कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांना बेळगावमध्ये एन 95 मास्क तयार होत असल्याची माहिती समजताच उद्योजक दयानंद नेतलकर यांना बोलावून त्यांचे कौतुक केले. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांच्याशी लवकरच भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
सॅनिटरी नॅपकिन उद्योगात उतरण्याचे ध्येय
श्रीनिवास वेलनेस ही कंपनी मास्कसोबतच सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याच्या उद्योगात उतरण्याचे ध्येय उराशी बागळून आहे. मास्कप्रमाणेच सर्वसामान्य महिलांपर्यंत सॅनिटरी
नॅपकिन पोहोचविण्याचा भविष्यात प्रयत्न केला जाईल, असे दयानंद नेतलकर यांनी सांगितले.
हा मास्क मिळतो कुठे?
एन 95 मास्क कोणत्याही डिलरकडे विक्रीसाठी न देता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा श्रीनिवास वेलनेसचा भर आहे. येत्या काळात प्रत्येक मेडिकलमध्ये तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापूर्वी ज्या नागरिकांना खरेदी करायचा आहे त्यांनी उद्यमबाग येथील डच इंडस्ट्रीतील श्रीनिवास वेलनेस किंवा जुना धारवाड रोड येथील नेतलकर इंडस्ट्रीज वर्क्स येथे संपर्क साधावयाचा आहे.









