प्रतिनिधी /बेळगाव
अजंठा फिल्म सोसायटी व लोकमान्य ग्रंथालय यांच्या सहकार्याने दि. 10 ते 12 एप्रिल दरम्यान लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. कोविड काळातील दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर चित्रलोक पुन्हा कार्यान्वित होत आहे. याची सुरूवात सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता क्लिंट ईस्टवुड यांच्या तीन वेगवेगळय़ा धर्तीच्या चित्रपटांच्या तीन दिवसीय महोत्सवाने केली जाणार आहे.
क्लिंट ईस्टवुड यांची हॉलिवुडमधील कारकीर्द सहा दशके इतकी प्रदीर्घ राहिली असून 1960 च्या दशकातील डॉलर सीरिज या वेस्टर्न धर्तीच्या चित्रपट मालिकेतील कणखर काऊबॉयच्या अभिनयामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. सुरुवातीला ‘दे-मार’ चित्रपटातून भूमिका करणाऱया ईस्टवुड यांनी पुढे वेगळय़ा धर्तीचे, वेधक विषयांवरील चित्रपट निर्माण करून दिग्दर्शन क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.
10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱया ‘द अनफर्गिव्हन’ या नववेस्टर्न धर्तीच्या चित्रपटाला चार ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पुरस्कार मिळण्याबरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ईस्टवुड यांना या चित्रपटासाठी नामांकन लाभले आहे.
11 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणाऱया ‘ग्रँड टोरिनो’ या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन व प्रमुख भूमिका क्लिंट ईस्टवुड यांची आहे. 12 एप्रिल रोजी दाखवण्यात येणारा ‘एव्हरी विच वे बट लूज’ हा चित्रपट ईस्टवुड यांच्या अपवादात्मक विनोदी चित्रपटातील एक होय. ईस्टवुडच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा हा धमाल चित्रपट आहे.
‘चित्रलोक’चे कार्यक्रम केवळ सभासदांसाठी असून सभासद नोंदणी सुरू आहे. अतिथी प्रवेशिका कार्यक्रमाच्या वेळेपूर्वी सभागृहामध्ये उपलब्ध असतील. चित्रलोकचे सभासद होण्यासाठी लोकमान्य ग्रंथालय, हरिमंदिरसमोर, अनगोळ रोड येथे 9901685503 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









