45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे ध्येय : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोना लसीकरण उत्सव 11 ते 20 एप्रिलपर्यंत राबवण्यात येणार असून गरज पडली तर तो 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंचायत पातळीवर हा उत्सव करण्यात येणार असून त्यात 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ते 14 एप्रिल असे एकूण 4 दिवस टिका उत्सव (लस) करण्याचा कानमंत्र व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिला होता. तोच उत्सव गोवा राज्यासाठी पुढे काही दिवस वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्याचे सरकारने ठरविले असून तशी तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य केंद्रातून लसीकरणाची व्यवस्था
लसीकरणासोबतच चाचणीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न सरकार करणार असून लोकांनी लक्षणे दिसताच चाचणी करुन घ्यावी तसेच न घाबरता कोरोनाची लसही टोचून घ्यावी. सर्व आरोग्य केंद्रातून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून त्याची कमतरता गोव्यात कुठेही नाही, असेही ते म्हणाले.
पंच, सरपंच, आमदारांनी पुढाकार घ्यावा
आरोग्य खात्यातर्फे ज्या पंचायतीत सर्व साधन – सुविधांची सोय आहे तेथे हा लसीकरण उत्सव करण्यात येणार आहे. स्थानिक आमदार, सरपंच व इतर लोकप्रतिनिधीनी त्यांच्या पंचायतीत हा उत्सव करायचा असे निर्देश त्यांना देण्यात आले असून त्याकरीता त्यांनी आरोग्य खात्याशी संपर्क साधावा असेही डॉ. सावंत यांनी सूचित केले. सर्वांनी या करीता पुढाकार घ्यावा आणि जबाबदारीने काम करुन 45 वर्षांवरील सर्वांना लस मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. त्या सर्वांना लस मिळाली तर 50 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण होईल, अशी खात्री डॉ. सावंत यांनी वर्तवली.
दिवसभरात कोरोनाचे तीन बळी

गेल्या 24 तासात म्हणजे शुक्रवारी कोरोनामुळे 3 जणांचा बळी गेला असून 428 नवे बाधित सापडले आहेत तर 159 जण बरे होऊन घरी परतले. एकूण कोरोना बळीचा आकडा 845 झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 3597 वर पोहोचली आहे. संशयित रुग्ण म्हणून 58 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 270 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून अनेक केंद्रांनी रुग्णांचा शेकडा गाठला आहे.
आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेले एकूण रुग्ण 60 हजार पार झाले असून 61239 वर पोहोचले आहेत तर त्यातील 56797 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली 105, सांखळी 73, पेडणे 67, वाळपई 27, म्हापसा 191, पणजी 278, हळदोणा 64, बेतकी 13, कांदोळी 256, कासारवर्णे 26, कोलवाळ 50, खोर्ली 119, चिंबल 101, शिवोली 133, पर्वरी 367, मये 20, कुडचडे 52, काणकोण 57, मडगांव 339, वास्को 171, बाळ्ळी 39, कासावली 120, चिंचिणी 73, कुठ्ठाळी 195, कुडतरी 49, लोटली 60, मडकई 18, केपे 28, सांगे 77, शिरोडा 47, धारबांदोडा 36, फोंडा 286, नावेली 47. गोव्यात विविध मार्गाने आलेल्या 13 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.









