ऑनलाईन टीम / मुंबई :
एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने 12 आठवडय़ांची मुदत दिली आहे. तरीही काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यांनी उद्यापर्यंत कामावर रुजू होणे अपेक्षित आहे. कर्मचारी हजर न राहिल्यास सरकारकडे प्लॅन बी तयार आहे, असा निर्वाणीचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
परब म्हणाले, एसटी महामंडळ आगोदरच 12 हजार कोटींच्या तोटय़ात आहे. संपामुळे आणखी 6 हजार कोटींची भर पडली. एसटी जगली तर सर्वकाही ठिक होईल. कर्मचाऱयांना कबुल केल्याप्रमाणे मी वेतनवाढ दिली आहे. उच्च न्यायालयाने वेळ दिल्याप्रमाणे 12 आठवडय़ात विलीनीकरणासंदर्भात जो काही आहे तो निर्णय होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उद्यापर्यंत कामावर हजर राहावे. लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आपल्या मागण्यांसाठी जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. दरम्यान, अद्याप कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांनी उद्यापर्यंत कामावर यावे, अन्यथा सरकारकडे प्लॅन बी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.








