ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा विश्वास; पाटणमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन
शहर प्रतिनिधी/ पाटण
साहित्य संमेलने नव्या पिढीला जगायचं कसं अन वाचायचं कसं हे शिकवतात. तर ग्रंथ महोत्सव नव्या पिढीला ऊर्जा देतात. गावात पुस्तकांची संग्रहालये असणे म्हणजे गाव समृध्द असणे. संमेलन संस्कार देतात, जीवन जगण्यास प्रेरणा देतात. वाचन संस्कृती रूजवण्यासाठी तुम्ही वाचत रहा. उद्याचं जग हे वाचणाऱयांचे असणार आहे, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक, प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केला. तसेच विक्रमबाबांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार सुरू करून लोकांना व्यासपीठ दिले आहे. पुढील काळात महोत्सवाची व्याप्ती वाढवण्यासाठी या उपक्रमाला राज्य सरकारचे पूर्णपणे सहकार्य असेल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी संमेलनात बोलताना दिली.
येथील स्वा. सै. कै. भडकबाबा नगरीत आयोजित केलेल्या ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनात ते बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, आरपीआयचे सरचिटणीस प्रा. रवींद्र सोनावले, मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, डॉ. विद्या पाटील, शिवसेनेचे नानासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. लवटे पुढे म्हणाले, ज्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार असते, तेच लोक साहित्य संमेलनास उपस्थित असतात. मांडव घालायचं काम आपण करायचं. एक दिवस मांडावापलिकडे गर्दी जाईल. तुम्हाला तुमच्या मुलांची पिढी वाचवायची असेल तर वाचनाची सुरवात केली पाहिजे. हल्ली लोक वाचत नाहीत. मात्र वाचनाने माणूस समृध्द होतो. अमरमृद्रा पुस्तके घडवत असतात. सातारा जिह्यात ग्रंथ संस्कृती रुजलेली आहे. ग्रंथ महोत्सव नव्या पिढीला उर्जा देतात. गावात पुस्तकांची संग्रालये असणे म्हणजे गाव समृध्द असणं. पुस्तके परंपरा जपतात. तुम्ही सुशिक्षित आहात याचं लक्षण म्हणजे तुमच्या घरी असणारं पुस्तकाचं भांडार. पुस्तक शस्त्र आणि शास्त्र आहे. लेखन, वाचन याची गोडी लागली पाहिजे. साहित्याची, काव्याची परंपरा सातारा जिह्याला लाभली आहे. अशी संमेलने भरली तरच नव्या पिढीला वाचनाची आवड निर्माण होईल. भाषेला उतरती कळा लागली तर देश मरतो. त्यामुळे भाषा टिकली पाहिजे.
नामदार शंभूराज देसाई म्हणाले, नेहमी शहरात संमेलने होतात. मात्र ग्रामीण भागात साहित्य संमेलन होत आहे, हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील लोकांना व विद्यार्थ्यांना पुस्तकाचे भांडार उपलब्ध करुन देऊन विक्रमबाबांनी मोलाचे काम केले आहे. संमेलनामुळे ज्ञानाचे भांडार उपलब्ध झाले आहे. अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. यातून नवनवीन विचार ग्रामीण भागात पोहोचले जातात. अधिक प्रभावी हे संमेलन करता यावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ग्रामीण भागातील माणसांपर्यंत व मुलांपर्यंत हे साहित्य व पुस्तके पोहचली पाहिजेत.
स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी मान्यवरांचे पुस्तके देऊन स्वागत केले. सौरभ देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विद्या पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन विजय गुरव यांनी केले. निकिता पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमा सकरणसिंह पाटणकर, हर्षवर्धन पाटणकर, स्वातीदेवी पाटणकर, उत्कर्षा पाटणकर, हर्षदा पाटणकर, प्रा. विजया म्हासुर्णेकर, प्रा. ए. व्ही. देशपांडे, डॉ. विद्या पाटील, डॉ. विना नांगरे, डॉ. अर्चना देशमुख, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, शंकरराव कुंभार, तानाजी घाडगे, डॉ. बी. पाटील, डॉ. नांगरे यांच्यासह ग्रंथप्रेमी, वाचक, साहित्यप्रेमी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठय़ासंख्येने उपस्थित होते.









