ऑनलाईन टीम / बिहार :
महाराष्ट्र राज्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असताना अभिनेत्री कंगना रानौत हिने केलेल्या विधानावरून राजकारण सुरु आहे. पण मला वाटते आमच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी कोरोना संकटावर लक्ष द्यायला पाहिजे असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. रविवारी बौद्धगया येथे झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कंगनावर केलेल्या टिके संदर्भात विचारले असता फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

ते म्हणाले, आज महाराष्ट्रात कोरोना महामारीचे मोठे संकट आहे. सद्य स्थितीत राज्यात 10 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्युपैकी चाळीस टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तसेच महाराष्ट्रात दररोज 20 ते 25 हजार रुग्णांची नोंद होते आहे. त्यामुळे मला वाटते की, आमच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटावर अधिक लक्ष दिले पाहिजे. कंगना, राजकारण, त्यांच्या पक्षाकडून नेव्ही अधिकाऱ्यावर झालेला हल्ला या सर्व गोष्टींकडे लक्ष असावेच पण सगळ्यात आधी कोरोनाशी लढाई लढावी, असा टोला फडणवीसांनी यांवेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.









