भाजप आणि शिवसेनेमध्ये 2014 पासून सुरु असणारे थेट हल्ले-प्रतिहल्ले आता टोकाला पोहोचले आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याच्या दिलेल्या प्रस्तावानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत तो पक्ष भाजपची बी टीम आहे, त्यामुळे त्यांच्याशी आघाडीचा प्रश्नच नाही असे वक्तव्य केले. पक्षाचे 19 खासदारांच्या 19 जिह्यांमध्ये शिव संपर्क अभियानाची घोषणा करतानाच, रविवारी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. एमआयएमचा प्रस्ताव ही भाजपची खेळी आहे. आपल्या मतदारांमध्ये ते संभ्रम पसरवत आहेत. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचाराला पुढे घेऊन जायचे आहे. आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्वाला नव्हे. आमच्यावर टीका करणाऱया भाजपने भारत पाकिस्तान बस सेवा सुरु केली, पाकिस्तानात जाऊन मोदींनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला, मग तुम्हाला हिजबुल पक्ष म्हणायचे का? आमच्यावर जनाब वगैरे म्हणून टीका करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर त्यांना खान म्हणणार का? भाजपचे देशातील आक्रमक नेतृत्व आणि त्यांचा पंचायती पासून लोकसभेपर्यंत सर्व जागा जिंकण्याचा आग्रह या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. आपल्याला त्यांच्या विरोधात पक्ष भक्कम करायचा आहे. जेथे भाजपचे उमेदवार निवडून आले तेथे आपल्या पक्षाचा उमेदवार हेरा, त्याला आतापासून बळ द्या. त्यांची यादी पक्षाला कळवा शिवाय जुन्याजाणत्या मंडळींनाही भेटून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन केले आहे. स्वतःही राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेताना, अजानच्या स्पर्धा तुमच्या पक्षाने लावल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे जनाब लिहिलेले सहन केले त्यांनी आमच्यावर टीका का करावी? असा प्रश्न केला तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आधी मंत्रालयात या मग राज्यभर फिरा अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे 2014 सालापासून संघर्षाच्या एका नव्या वळणावर उभे आहेत. त्यापूर्वीचा त्यांचा संघर्ष आणि आताचा संघर्ष यात खुप अंतर आहे. या नव्या संघर्षाने त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यापूर्वी स्वकियांशी लढण्यात त्यांची शक्ती खर्ची पडली पण पक्षात वर्चस्व वाढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर येऊन पडलेली जबाबदारी आणि त्याच काळात भाजपने साथ सोडली. पण या वादाची बीजेही शोधणे आवश्यक आहे त्याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या संघर्षाची दिशा लक्षात येणार नाही. 1995च्या शिवशाही सरकारच्या काळात त्यांचा शिवसेनेमध्ये वावर स्पष्टपणे दिसत होता. यापूर्वी दैनिक सामनाच्या माध्यमातून किंवा शिवसेनेच्या प्रचार कार्यक्रमांची पडद्यामागे राहून त्यांची सुरू असणारी कामगिरी कोणाच्याही नजरेसमोर नव्हती. शिवसेना स्थापनेचा नारळ फुटताना त्या नारळाचे पाणी आपल्या अंगावरही उडले आहे, हे अलीकडच्या काळात त्यांनी आवर्जून सांगितले होते. आपण शिवसेनेत अचानक लादले गेलो या आरोपाला अप्रत्यक्ष उत्तर देण्याचीच ती तयारी होती. शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनात त्यांच्याकडे पक्षाची अधिकृत जबाबदारी सोपवण्यात आली. राज ठाकरे यांनी त्यांचे नाव सुचवले, ती आपली चूक होती असे मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी म्हटले होते. तत्पुर्वी 2002 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी ‘मी मुंबईकर’ अभियान सुरु केले. ज्यामध्ये मराठी माणसांबरोबरच हिंदी आणि अन्य भाषिकांना शिवसेनेबरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. तो राज यांनी हाणून पाडला. पण 1999 पासूनच पक्षात उध्दव ठाकरे वरचढ ठरु लागले आणि शाखा पातळीवर संपर्क वाढवून त्यांनी मुंबईत आपले वर्चस्व निर्माण केले. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या सोबतच भाजपनेही आपल्या मुख्यमंत्रीपद व नेतृत्वाला केवळ उध्दव ठाकरे आव्हान ठरतील हे जाणले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर थेट हल्ला न करता त्यांच्या भोवती जमलेले लोक कारकून, चौकडी आहेत असा दोष दिला. प्रखर वक्तव्यानंतर राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली. दोन्ही आघातानंतर सेना कमकुवत होताना दिसत होती. 15 वर्षे विरोधात बसायची त्यांच्यावर वेळ आली. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येत राहिली. संख्याबळ घटले, भाजप स्वतःचे वेगळे निर्णय करु लागला. पण राज-राणेंसह इतर विरोधकांवर मात करत पक्षात आणि मुंबईत वर्चस्व निर्माण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. तोडफोड, व्हॅलेंटाईन डे विरोध असे पक्षावर टीका होणाऱया प्रश्नी धाडसाने भूमिका बदलली. प्रचंड टीका सहन केली. पक्ष संपवला असे आरोपही झेलले. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे समोर पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले. मोदी लाटेत देशात भाजप आणि राज्यात शिवसेनेची सत्ता हा फॉर्म्युला मोडला. भाजपने युती तोडली. भाजपचे संख्याबळ वाढले आणि शिवसेनेला भाजप सत्तेसोबत फरफटावे लागले. 2019 च्या निवडणुकीआधी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला झुंजवले. राज्यातील सत्तेचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी आणि राम मंदिरच्या प्रश्नावर भाजपला कोंडीत पकडून लोकसभा आणि विधानसभेची युती निश्चित केली. सत्तेत निम्मा वाटय़ाचा शब्द जाहीररित्या मिळवला आणि निवडणुकीनंतर पहिले मुख्यमंत्रीपद सेनेला मागितले. जे भाजपने अमान्य केले आणि महाविकास आघाडीचा धक्कादायक निर्णय त्यांनी घेतला. असे धाडसी निर्णय, प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार, मोदींना थेट आव्हान गेल्या अडीच वर्षात कोरोना स्थिती हाताळणीने त्यांचे नाव पारंपारिक मतदारांच्या वर्तुळाबाहेरही झाले. तर सरकारवर झालेल्या आरोपांनी त्यांच्या प्रतिमेला धक्काही बसला. भाजपने बनवलेल्या या नव्या प्रतिमेविरुध्द आता उध्दव ठाकरे यांचा संघर्ष सुरु झाला आहे. आक्रमकपणे प्रतिकाराचा मार्ग ठाकरे यांनी पत्करला आहे. त्यासाठी टोकाची टीकाही त्यांनी सुरु केली आणि संघटनेलाही जागृत करत थेट लोकांमध्ये आपली बाजू पोहोचवण्याची रणनीती आखली आहे.
Previous Articleतेलगू अभिनेत्री गायत्रीचा दुर्घटनेत मृत्यू
Next Article कितीही सैन्य पाठवा, कब्जा करणे अशक्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








