चमोली / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चमोली जिल्हय़ात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील सोमवारी सायंकाळपर्यंत 18 मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही 202 लोक बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती सोमवारी प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान, लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाचे पथक, आयटीबीपीचे जवान आणि हवाई दल परस्पर समन्वय राखून मदतकार्यात गुंतले आहेत. निवडक गिर्यारोहकांची पथकेही मदतकार्यात सहभागी झाली आहेत. एक मोठे वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
हिमकडा कोसळल्यामुळे ऋषीगंगा खोऱयातील अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याची पातळी एकदम वाढली आणि पाणी वेगाने पुढे सरकू लागले. पाण्याच्या मोठय़ा प्रवाहात सापडल्यामुळे शेकडो नागरिक वाहून गेले आहेत. आतापर्यंत 18 मृतदेह हाती आले आहेत. उत्तराखंड सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफमधून सर्व मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर केली आहे. अजूनही दोनशेहून अधिक जण बेपत्ता आहेत. रैनी गावाला सर्वात मोठा फटका बसला आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. जवळपास 180 शेळय़ा-मेंढय़ा आणि त्यांना चरायला घेऊन गेलेले पाच जण वाहून गेले आहेत. त्यांच्याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही. नौदलाचे प्रशिक्षित पाणबुडे पाण्यात खोलवर जाऊन बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. ज्या भागातून पाणी उसळत पुढे सरकले, त्या भागातील सर्व दरी-खोऱयांमध्ये तसेच प्रवाहाच्या दोन्ही किनाऱयांवर शोधमोहीम सुरू आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी गावातील 30 मजुरांचा समावेश असल्याची माहितीही प्रशासकीय पातळीवरून उपलब्ध झाली आहे.
जोशीमठ तसेच चमोली जिह्यातील तपोवन येथे तात्पुरत्या हॉस्पिटलची व्यवस्था तातडीने करण्यात आली आहे. दोन्ही हॉस्पिटलमध्ये विशेष डॉक्टरांची टीम सज्ज आहे. जखमींवर उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने मोठय़ा हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. श्रीनगर मेडिकल कॉलेज, एम्स ऋषिकेश आणि जॉली ग्रँट हॉस्पिटल यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
प्रकल्पांची कामे अडचणीत
पाण्याची पातळी वाढल्यामुळे ऋषीगंगा नदीवरील 13.2 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प वाहून गेला. प्रकल्पात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा शोध सुरू आहे. तसेच धौलीगंगा नदीवरील तपोवन भागातील एनटीपीसीचा जलविद्युत निर्मिती प्रकल्पही अडचणीत सापडला आहे.
केंद्र सरकारकडून आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या संपर्कात आहेत. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिमकडा कोसळल्यानंतर उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी करण्यात आहे. अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांचे पाणी उत्तर प्रदेशमध्येही वाहत येते. याच कारणामुळे खबरदारी घेतली जात आहे.
धोकादायक ठिकाणांची पाहणी सुरू
हवामान विभाग आणि डीआरडीओचा ड्रोन यांच्या मदतीने उत्तराखंडमधील सर्व डोंगररांगाची तातडीने पाहणी सुरू झाली आहे. ज्या भागांमध्ये मोठे हिमकडे कोसळण्याची शक्मयता आहे. अशा सर्व भागांपासून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. हिमकडय़ांमुळे पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी तज्ञांच्या मदतीने योग्य ते उपाय केले जात आहेत. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
बोगद्याचे काम सुरू असताना दुर्घटना तपोवनजवळ एका दरीत बोगदा करून तांत्रिक कामे सुरू होती. पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे तिथे काम करत असलेले सोळा जण अडचणीत सापडले होते. या सर्वांची आयटीबीपीच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. एका व्यक्तीने बोगद्यातून सुखरुप बाहेर आल्याचे बघून हात वर करून लगेच आनंद व्यक्त केला.









