उपेंद्र यादवचे द्विशतक, मुंबईची खराब सुरुवात
वृत्तसंस्था/ मुंबई
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेतील मुंबईविरुद्ध लढतीत उत्तर प्रदेशने आपला पहिला डाव 8 बाद 625 धावांवर घोषित केला. उपेंद्र यादवचे दमदार द्विशतक व आकाशदीप नाथचे शतक हे दुसऱया दिवशीच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. यानंतर, मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली असून दुसऱया दिवसअखेरीस त्यांनी 2 गडी गमावत 20 धावा केल्या होत्या. भुपेंद लालवानी 6 तर हार्दिक तोमोर 1 धावांवर खेळत होते. मुंबई संघ अद्याप 605 धावांनी पिछाडीवर आहे.
प्रारंभी, उत्तर प्रदेशने 4 बाद 281 धावसंख्येवरुन दुसऱया दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. डावातील पहिल्याच षटकांत शतकवीर आकाशदीप नाथला तुषार देशपांडेने बाद करत मुंबईला पाचवे यश मिळवून दिले. आकाशदीपने 115 धावा केल्या. रिंकु सिंगही 84 धावांवर बाद झाल्याने युपी संघाची 6 बाद 303 अशी स्थिती झाली होती. यानंतर, उपेंद्र यादवने शानदार द्विशतकी खेळी साकारताना मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. उपेंद्रने 239 चेंडूचा सामना करताना 27 चौकार व 3 षटकारासह नाबाद 203 धावांचे योगदान दिले. त्याला सौरभ कुमार (44) व यश दयाल (नाबाद 41) यांनी चांगली साथ दिली. उपेंद्रच्या या द्विशतकी खेळीमुळे उ.प्रदेशने आपला पहिला डाव 159.3 षटकांत 8 बाद 625 धावांवर घोषित केला.
मुंबईच्या पहिल्या डावाची सुरुवात मात्र खराब झाली. घरच्या मैदानावर खेळताना सलामीवीर जय बिस्ता सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरला. 3 धावा काढून तो बाद झाला. स्वप्नील आतर्डेलाही (9) फारशी चमक दाखवता आली नाही. यानंतर, भुपेन लालवानी (नाबाद 6) व हार्दिक तोमोर (नाबाद 1) यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 7 षटकांत 2 बाद 20 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : उत्तर प्रदेश पहिला डाव 159.3 षटकांत 8 बाद 625 घोषित (आकाशदीप नाथ 115, उपेंद्र यादव नाबाद 203, रिंकु सिंग 84, सौरभ कुमार 44, दास 3/103, तुषार देशपांडे 2/135, स्वप्नील आतर्डे 1/86).
मुंबई पहिला डाव 7 षटकांत 2 बाद 20 (जय बिस्ता 3, लालवानी खेळत आहे 6, आतर्डे 9, तोमोर खेळत आहे 1, अंकित रजपूत 2/15).
आसामविरुद्ध महाराष्ट्राला 37 धावांची आघाडी
गुवाहाटी : रणजी चषक स्पर्धेत आसामविरुद्ध सामन्यात महाराष्ट्राला 37 धावांची आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्राचा पहिला डाव 175 धावांत संपुष्टात आल्यानंतर आसामने पहिल्या डावात 244 धावा केल्या. पहिल्या डावात त्यांना 69 धावांची आघाडी मिळाली. यानंतर, दुसऱया डावात खेळताना महाराष्ट्राने सावध सुरुवात केली. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 36 षटकांत 2 बाद 106 धावा जमवल्या होत्या. जय पांडेने नाबाद 52 धावा केल्या तर गुगळेने 38 धावांचे योगदान दिले. दिवसअखेरीस पांडे 52 व अंकित बावणे 7 धावांवर खेळत होते.
इतर सामन्यांचे निकाल
- बंगाल 7/635 घोषित वि हैदराबाद 5/83
- उत्तराखंड 227 व बिनबाद 4 वि झारखंड 298
- विदर्भ 179 व बिनबाद 35 वि दिल्ली 163
- गुजरात 281 व बिनबाद 23 वि पंजाब 229
- हिमाचल प्रदेश 496 वि बडोदा 2/150
- सौराष्ट्र 344 वि मध्य प्रदेश 5/183
- हरियाणा 176 व 133 वि सेनादल 97
- गोवा 251 वि चंदीगड 3/310









