प्रतिनिधी/ बेळगाव
ब्रिटीशकालिन रेल्वे ओव्हरब्रिज हटवून गोगटे चौक येथे नव्याने उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. सदर उड्डाणपूलाची उभारणी स्टेट बँक ऑफ इंडिया पर्यंत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. पण आता गोगटे चौकात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला आहे.
मराठा मंदिर ते गोगटे चौक पर्यंत रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी दोन वर्षापूर्वी करण्यात आली. सदर उड्डाणपुलाची उभारणी रेल्वे खाते आणि राज्य शासनाच्या पायाभूत सुविधा खात्याच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या दृष्टीने रेल्वे पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गोगटे चौकात होणारी वाहतुक कोंडी याचा विचार करण्यात आला नाही. पुलाची उभारणी करताना अन्य समस्यांबाबत चाचपणी करण्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळेच आता या प्रस्तावाचा विचार करावा लागला आहे. 19 कोटी निधी खर्चून ब्रिटिश कालीन उड्डाणपुलाच्या ठिकाणी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली.
गोगटे चौकात चार रस्ते मिळत असल्याने या चौकात वाहतुक कोंडी निर्माण होते. तसेच या चौकात मिळणारे रस्ते थेट नसल्याने वाहतुक कोंडीच्या समस्येत भर पडली आहे. संचयनी चौकातून खानापूर रोड तसेच काँग्रेस रोडने जाणाऱया वाहनांची गर्दी चौकात होत असते. त्यामुळे याचा विचार करून मराठा मंदिर पासून एसबीआय बँकेपर्यंत उड्डाण पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी उड्डाण पुलाच्या उभारणी वेळी करण्यात आली होती. रेल्वे ओव्हरब्रिजसाठी उभारण्यात येणारा उड्डाणपुल गोगटे चौकात देखील उभारण्यात आल्यास खानापूर रोडकडे जाणाऱया वाहनधारकांना उड्डाण पुलावरून येणाऱया वाहनांचा अडथळा झाला नसता. पण याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उभारणी नंतरही गोगटे चौकात होणाऱया वाहतुक कोंडीची समस्या जैसेथे आहे. त्यामुळे आता या ठिकाणी नव्याने उड्डाणपुल उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलापासून एस. बी. आय. बँकेपर्यंत नव्याने उड्डाणपुल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. रेल्वे मार्गाजवळ उभारण्यात आलेल्या गर्डरपासून नविन पूल उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाची उभारणी स्मार्ट सिटी योजना, राज्य शासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









