प्रतिनिधी / कोल्हापूर
उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून गुणात्मक सुधारणा घडवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊले विद्यापीठ अनुदान आयोगाने उचलली आहेत. यामध्ये नॅशनल ऍकॅडेमिक क्रेडिट बँक (एनएसी) आणि सेमिस्टर आउटरीच प्रोग्राम (एसओपी) यासोबतच आणखी 10 विषयांचा समावेश आहे. पूर्वीच्या गुरुकुल शिक्षण
प्रणालीमध्ये तंत्रज्ञान वापरुन गुरुकुल शिक्षण पद्धतीकडे वळण्याची गरज आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा 56 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राजमाता जिजाऊ सभागृहात दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रा. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, विद्यपीठ अनुदान आयोगाच्या स्ट्राईक योजनेमध्ये राज्यभरातून एकमेव शिवाजी विद्यापीठाची निवड झाली आहे. विद्यापीठात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षण विद्यार्थी केंद्रीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. पारंपारिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांवर लादून विद्यार्थी कुशलतेने उत्तरे देतील; पण यातून शैक्षणिक प्रगती होतेच असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणावर फक्त प्राध्यापकांची मक्तेदारी असल्यासारखे प्राध्यापक सध्या वागत आहेत. मात्र आजच्या जगात विद्यार्थ्याकडूनही खूप काही शिकण्यासारखे असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. युजीसी गुणवत्ता मंडळाने विद्यार्थी उदबोधन शिबीर, शिक्षण परिणाम आधारीत अभ्यासक्रम, शिक्षण प्रक्रियेत आयसीटीचा वापर, जीवन कौशल्य, सामाजिक व उद्योग एकत्रिकरण, मूल्यांकन सुधारणा, करिअर प्रगती, माजी विद्यार्थी संघ, विद्याशाखा विकास, मान्यता प्रक्रिया बळकट करणे आणि संशोधनास
प्रोत्साहन करणे अशा कार्यक्रमांचा समावेश केला आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे दर्जेदार संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना जाहीर केली असल्याचेही
प्रा. डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.
दिलदार कोल्हापूर
कोल्हापूर शहर दिलदार आहे. येथील माणसेही दिलदार ओत. कोल्हापूर शहर एक रोल मॉडेल आहे. येथील दूध, कुस्ती, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर यासह कोल्हापूरातील प्रत्येक गोष्ट रोल मॉडेल आहे. याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. जयहिंद जय महाराष्ट्र जय कोल्हापूर अशा शब्दात पटवर्धन यांनी कोल्हापूरचा गौरव केला.