प्रतिनिधी / शाहुवाडी
उचत पैकी लहीन परिसरासह पंधरा गावातील कंटेन्मेंट झोन बाबत पुढील आदेश येईपर्यंत या परीसरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणती ही दुकाने सुरू करता येणार नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत कंटेन्मेंट झोन कायम राहणार असून याला व्यापारी वर्गासह नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार गुरु बिराजदार यांनी मलकापूर नगरपरिषदेत व्यापारी व प्रशासन यांच्या बैठकीत केले.ऑरेंज झोन मधील व्यवसाय सुरू करण्यास जिल्हास्तरावर नियम व अटीस बांधील राहुन परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरातील व्यापारी व प्रशासन यांच्यात मलकापूर नगरपरिषद येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते या बैठकीस जिल्हा परीषद सदस्य सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख. मुख्याधिकारी शिला पाटील, आरोग्य अधिकारी आर. एच. निरंकारी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
उचत पैकी लहीन गल्ली येथे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेच्या अनुशंगाने प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एका रुग्णावर उपचार सुरू आहेत सध्या 15 गावात कंटेन्मेंट झोन आहे. यामुळे या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र जिल्हयात अन्य व्यवसाय सुरू झाल्याने मलकापूर शहरातील बाजारपेठ सुरू करण्याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरातील सर्व वर्गातील व्यापारी व प्रशासन आणि नगरपरिषदेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी कंटेन्मेंट झोन बाबत असणारी सर्व माहिती संबंधितांना दिली व पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील कोणताही व्यवसाय अथवा दुकाने सुरू करता येणार नाही असे स्पष्ट केले. या बैठकीस उपनगराध्यक्षा सोनिया शेंडे,यांच्यासह पालिकेचे इतर पदाअधिकारी उपस्थित होते.








