लॉकडाऊनचा फटका : कवडीमोल दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात
वार्ताहर / उचगाव
लॉकडाऊनमुळे परिसरातील शेतकरीवर्ग मोठय़ा आर्थिक संकटात अडकला आहे. भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने कोबी पिकावर शेतकरी अक्षरशः ट्रक्टर फिरवून पुढील भात पिकाच्या पेरणीसाठी जमीन रिकामी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार टप्प झाले आहेत. शेतकरीवर्गाने कष्ट करून मुबलक भाजीपाला पिकविला आहे. पश्चिम भागातील उचगाव, सुळगा, तुरमुरी, बाची, कल्लेहोळ, बेनकनहळ्ळी, आंबेवाडी, गोजगा, मण्णूर, सावगाव, बेळगुंदी, सोनोली या भागात मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन काढले जाते. सर्व शेती विविध पिकांनी बहरून आली आहे. कोबी, फ्लॉवर, नवलकोल, मुळा, बिनीस, बावची, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो, भेंडी, गाजर, लाल भाजी, मिरची, मका अशी सर्वच पिके तयार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरीच बसून आहेत.
शहरात एकीकडे नागरिक भाजीसाठी वणवण करत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात भाजीपाला भरघोस आला आहे. तो मार्केटमध्ये विक्रीसाठी नेताना अनेक अडचणीशी सामना करावा लागत आहे. काढलेली भाजी वेळेत पाहेचेल की नाही याची शंका तर मार्केटमध्ये कवडीमोल दराने उत्पादकांना मिळणार दर परवडत नसल्याने या भाजीपाल्यावर अखेर ट्रक्टर फिविण्याची वेळ आता शेतकरीवर्गावर आली आहे.
पश्चिम भागातून वाहणाऱया मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या जमिनीत अशी सर्व पिके भरघोस आली आहेत. संपूर्ण परिसर हिरवागार पाहावयास मिळतो मात्र लॉकडाऊनमुळे शेतकरीवर्गाची मोठी फसगत झाली आहे. मोठय़ा आर्थिक संकटात शेतकरी अडकला आहे.
बेळगाव शहराच्या चोहोबाजूनी असलेल्या खुल्या भागात त्या त्या भागातून येणारा भाजीपाला थेट ग्राहकांना शेतकरीवर्गालाच विक्री करण्याची मुभा शेतकरीवर्गालाच द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.