वार्ताहर/ उगारखुर्द
शतावरी व अश्वगंधा या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून एकरी 3 लाख रुपयाचे आमिष दाखविण्यात आले. तसेच पीक विकत घेण्याचे आश्वासन देत येथील पाच शेतकऱयांची फसवणूक करण्यात आली आहे. सदर फसवणुकीचा आकडा हा जवळपास पावणे पाच लाख रुपयांचा आहे. सदर प्रकार नुकताच उघडकीस आल्याने परिसरातील शेतकऱयांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (रा. धायरी जि. पुणे) याने शून्य हर्बल ऍग्रो डेव्हल्पमेंट कंपनीची 3 वर्षांपूर्वी स्थापना केली. या कंपनीमार्फत येथील पाच शेतकऱयांना शतावरी व अश्वगंधा या औषधी वनस्पती लागवडी करण्यासंदर्भात माहिती दिली. याशिवाय उत्पादन लागवडीतून एकरी 3 लाख रुपये मोबदला देणारे पीक स्वतःच काढून घेऊन जाऊ, असे आश्वासन दिले. या आमिषाला चंद्रकांत एन. यसोडगी, चोगोंडा एन. यसोडगी, गोपाल आर. देवमोरे, बाहुबली ए. निडगुंदी, अनिल बी. दाभ्यान्नावर हे शेतकरी बळी पडले.
यसोडगी बंधूंनी 3 एकरासाठी दीड लाख रुपये, देवमोरेनी दीड एकरासाठी 75 हजार, निडगुंदी यांनी 3 एकरसाठी दीड लाख तर दाभ्यान्नावर यांनी 2 एकरासाठी 1 लाख रुपये कंपनीच्या उत्पादनासाठी गुंतवले. सदर शेतकऱयांनी 15 जून 2019 रोजी शेतात लावण केली. त्यानंतर पीक फेब्रुवारी 2021 ला हाती लागण्यानंतर त्याची कापणी करून कंपनीला पाठविले.
दरम्यान, फसवणूक झालेल्या शेतकऱयांनी पुणे येथील कंपनीच्या कार्यालयास भेट दिली. मात्र तेथे सदर अधिकाऱयांची भेट होऊ शकली नाही. शिवाय पैसेही मिळाले नाहीत. सदर कंपनीने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱयांना गंडा घातला असून 23 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱयांनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. त्यादरम्यान आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी पोलीस उपायुक्त अमिताब गुप्ता यांना सर्व माहिती सांगितली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे.









