इटलीचा एटना ज्वालामुखी पुन्हा जागृत : 1128 अंशावर पोहोचले तापमान
इटलीच्या एटना ज्वालामुखीचा मंगळवारी 15 दिवसांमध्ये तिसऱयांदा विस्फोट झाला आहे. 1500 मीटरच्या उंचीपर्यंत धूराचे लोट दिसून येत असून दोन किलोमीटरच्या परिसरात त्याची राख पसरली आहे. ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर 1128 अंश तापमान असलेल्या उकळत्या लाव्हारसाच्या नद्याच वाहू लागल्या आहेत. इतक्या प्रचंड तापमानात लोखंडही वितळू शकते.
ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर सिसली बेटानजीकचे भाग रिकामी करविण्यात आले आहेत. एटना 7 लाख वर्षे जुना आणि जगातील दुसरा सर्वाधिक सक्रीय ज्वालामुखी असल्याचे वैज्ञानिक सांगतात. तेथे दरवर्षी 10 लाख टन लाव्हारस, 70 लाख टन कर्बवायू आणि सल्फर डायऑक्साईड निर्माण होतो. जर याचा लाव्हारस समुद्रात जात राहिल्यास भयानक त्सुनामी येऊ शकते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.









