वार्ताहर/ उंडाळे
कराड-रत्नागिरी महामार्गावर उंडाळेनजीक दक्षिण मांड नदीवर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू असताना ठेकेदाराचा निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळेच कोल्हापूर जिह्यातील दोघा युवकांना प्राण गमवावे लागले आहेत. ठेकेदाराने रस्ता व्यवस्थित न अडवल्याने बांधकाम सुरु असलेल्या पुलात मोटरसायकल पडून दोन तरुण ठार तर एक जखमी झाला आहे. जानू भैरु झोरे (वय 35) व धोंडिबा भागोजी पाटणे (वय 33, रा. भेंडवडी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. दगडू बिरू झोरे (वय 40) हा जखमी झाला असून त्याच्यावर कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कराड- रत्नागिरी महामार्गावर उंडाळेनजीक पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे तिघे तरुण दुचाकी गाडीवरून आरळा-शेडगेवाडीकडून कराडच्या दिशेने येत असताना रस्ता मोकळा असल्याचे पाहून ते सरळ पुलाच्या दिशेने गेले. त्यावेळी अंधारात न दिसल्याने बांधकाम सुरू असलेल्या पुलात ते गाडीसहीत पडले. ही घटना तेथील वॉचमनने पाहिली व संबंधित ठेकेदारास व पोलिसांना कळविले. पोलिसांनी पोहोचून बांधकाम सुरू असलेल्या पुलावर पडलेल्या तिघांनाही बाहेर काढले. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सकाळी घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक भरणे यांनी भेट दिली. या अपघाताची नोंद कराड तालुका ग्रामीण पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे करत आहेत.
ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
दरम्यान, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तसेच सूचना फलक, बंदिस्त बॅरिकेट नसल्याने अपघात होऊन दोघा शेतकऱयांचा मृत्यू झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱयांसह वरिष्ठांकडे केली आहे. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
ठेकेदाराने सेवा रस्त्याच्या बाबतीत गांभीर्य दाखवले नाही. सूचनाफलक तसेच पर्यायी रस्ता जेथून दिला, त्या ठिकाणी पूर्णतः रस्ता बंद करणे गरजेचे असताना तो रस्ता मोकळा ठेवला. याशिवाय ज्या ठिकाणी बॅरिकेट्स लावले, त्या ठिकाणी रात्रीच्या लाल लाईटची गरज होती. ती केली नाही. रेडियम लावून त्या ठिकाणी वॉचमन ठेवण्याची गरज होती, पण हेही काम संबंधितांनी केले नसल्याने या अपघातास तेच जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांत व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
वरिष्ठांनीही ठेकेदारांना सूचना केल्या होत्या पण ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हा दुर्दैवी अपघात घडला असून याला ठेकेदार जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक भरणे यांची उंडाळे पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवदन सादर केले.








