क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी वास्कोतील टिळक मैदानावर ईस्ट बंगाल क्लब आणि चेन्नईन एफसी यांच्यात लढत खेळविण्यात येईल. ख्रिसमसमुळे दोन दिवस या स्पर्धेतील सामने खेळविण्यात आले नव्हते. सध्या चेन्नईन एफसीचे 6 सामन्यांतून 8 गुण व ते आठव्या स्थानावर तर शेवटच्या स्थानावर असलेल्या ईस्ट बंगालचे केवळ 2 गुण झाले आहेत.
यंदाच्या आयएसएलमध्ये प्रथमच खेळणाऱया ईस्ट बंगालच्या संघाने सहा सामन्यांतून एकही विजय नोंदविलेला नाही. या संघाने सर्वांत कमी म्हणजे तीन गोल प्रतिस्पर्धी संघांवर केले असून तब्बल 11 गोल केले आहेत. नोंदविलेल्या तीन गोलांपैकी दोन गोल जॅक्स माघोमाने हैदराबाद एफसीविरुद्धच्या सामन्यात केले आहेत. यानंतरही या आकडय़ांच्या पलीकडे त्यांच्या कामगिरीविषयी भाष्य करण्यासारखे काही मुद्दे आहेत. गेल्या दोन सामन्यांत त्यांच्या खेळात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. हैदराबादविरुद्ध एकही गुण न मिळणे त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरले. मागील सामन्यात बहुतांशवेळ केरळ ब्लास्टर्सवर वर्चस्व राखूनही त्यांना विजय मिळाला नाही. केरळ ब्लास्टर्सविरुद्ध त्यांना बरोबरी साधावी लागली. अखेरच्या क्षणी त्यांना गोल पत्करावा लागला. आता ही निराशा झटकून टाकली आहे. आम्ही येथे ज्या मनोधैर्याने दाखल झालो आहोत ते चांगले आहे. काहीवेळा आम्ही दुर्दैवी ठरलो.अखेरच्या क्षणी तुम्हाला गोल पत्करावे लागणे दुर्दैवी असते, पण खेळाडूंनी चांगला खेळ केला आणि गोलच्या बऱयाच संधी आम्ही निर्माण केल्या, असे फाऊलर म्हणाले.
आम्ही सामना अगदी सफाईदारपणे जिंकू शकलो असतो, पण शेवटी फुटबॉलचा खेळ असाच असतो, असे फाऊलर म्हणाले.
आमच्या खेळाडूंकडे प्रेरणेची कमतरता नाही. कामगिरीतील सुधारणेमुळे अपेक्षित निकाल साध्य होईल. कोणत्याही खेळाडूला प्रेरीत करणे अवघड नसेल. हा खेळ खेळणे ही आम्हा सर्वांची आवडती गोष्ट असल्याचे फाऊलर म्हणाले. आम्ही हा खेळ खेळतो, कारण आम्हाला तो आवडतो. यामुळे प्रेरणा नक्कीच आहे. आम्ही अपेक्षित निकालापासून फार लांब अंतरावर नाही. आम्ही कामगिरीला लवकरच कलाटणी देऊ आणि हे अगदी लवकरच घडेल अशी अपेक्षा असल्याचे फाऊलर म्हणाले.
चेन्नईन एफसीचा संघही प्रतिकूल स्थितीत आहे. ईस्ट बंगालप्रमाणे काही समस्या त्यांनाही भेडसावत आहेत. त्यांना आतापर्यंत पाचच गोल करता आले आहेत. त्यांच्यापेक्षा कमी गोल केवळ ईस्ट बंगालचे आहेत. त्यांचे दोनच गोल ओपन खेळातून झाले आहेत.
त्यांचा संघ मात्र एफसी गोवावरील मनोधैर्य उंचावणाऱया विजयासह येथे दाखल झाला आहे. स्पर्धेतील मोहिम पुढी कशी सरकते हे पुढील काही सामन्यांवरून स्पष्ट होईल, याची प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो यांना कल्पना आहे. तुम्ही संभाव्य विजेते असला तरी बरेच दडपण असते. तुम्ही दोन सामने जिंकले तर गुणतक्त्याच्या अग्रभागी जाता आणि दोन सामने हरलात तर खाली घसरतात. ईस्ट बंगालचा संघ नवा आहे. पण त्यांनी परिस्थितीशी चांगले जुळवून घेतली आहे. आम्हाला चांगली एकाग्रता साधावी लागेल आणि खेळावरील लक्ष कायम ठेवावे लागेल, असे लॅसझ्लो म्हणाले.









