नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये शुक्रवारी वेगवेगळय़ा वेळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात आसाममधील तेजपूर, मणिपूरचे चंदेल आणि मेघालयातील पश्चिम खासी हिल्सचा समावेश आहे. पहाटे 4.20 वाजता मेघालयातील पश्चिम खासी हिल्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच आसामच्या तेजपूरमध्येही भूकंप झाला. त्याची सर्वाधिक तीव्रता येथे 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तसेच मणिपूरच्या मोरंग येथेही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी, गुरुवारी संध्याकाळी 7ः49 वाजता जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाची नोंद झाली होती. जून महिन्यात आतापर्यंत जम्मूमध्ये तीनवेळा भूकंप झाला आहे. यापूर्वी 6 जून रोजी 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.









