वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संसर्गात होत असलेली वाढ चिंतेचे कारण ठरली आहे. ईशान्येतील राज्यांमध्ये आतापर्यंत अधिक संख्येत रुग्ण आढळले नव्हते. परंतु मागील 4 दिवसांमध्ये या राज्यांमधील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. त्रिपुरा तसेच आसाममधील रुग्ण वाढल्याने ईशान्येतील बाधितांचा आकडा 200 हून अधिक झाला आहे. 4 दिवसांपूर्वी हा आकडा 100 समीप होता.
ईशान्येतील पहिला रुग्ण 24 मार्च रोजी मणिपूरमध्ये आढळून आला होता. यानंतर 50 पर्यंत आकडा पोहोचण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी लागला. पुढील 18 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या 100 पर्यंत पोहोचली. 4 मे रोजी कोरोना बाधितांचे प्रमाण 100 च्या पलिकडे गेले होते.
रविवारच्या सकाळी प्रसिद्ध आकडेवारीनुसार ईशान्येतील राज्यांमध्ये एकूण 212 बाधित आहेत. सर्वाधिक 132 रुग्ण त्रिपुरात आढळून आले आहेत. तर आसाममध्ये 63 बाधित सापडले आहेत. नागालँडमध्ये एक रुग्ण सापडला होता. तर मेघालयात 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्रिपुरात पहिले दोन रुग्ण निगेटिव्ह आढळून आल्यावर 24 एप्रिल रोजी राज्याला कोरोनामुक्त घोषित करण्यात आले होते. परंतु 2 मे रोजी बीएसएफच्या 138 व्या बटालियनचे 2 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले. पुढील दिवशीच 12 आणखीन जवान बाधित सापडले आहेत.
त्रिपुरात बाधित जवानांच्या स्रोताचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. राज्याने दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलला त्रिपुरात येण्याचे आवाहन केले आहे. आसामनेही अन्य राज्यांमधून येणाऱयांसाठी सीमा खुली केल्यावर रुग्ण वाढू लागले.
जोरहाटच्या दोन महिला बाधित आढळल्या असून यातील एक महिला मुंबईतून रुग्णवाहिकेद्वारे परतली होती. रुग्णवाहिकेचा चालकही कोरोनाबाधित आहे. तसेच रविवारी राज्यातील एकूण रुग्णसंख्या 63 झाली आहे. आसाममध्ये आतापर्यंत 34 जणांनी कोरोनावर मात केली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मेघालयात 19 दिवसांनी नवा रुण सापडला असून एकूण आकडा 13 वर पोहोचला आहे. 10 जण बरे झाले असून 2 जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व रुग्ण एका स्रोताशी संबंधित आहेत. मिझोरमने शनिवारी स्वतःला कोरोनामुक्त घोषित केले आहे.









