ऑगस्टमध्ये 16.99 लाख सदस्य जोडले : पहिल्यांदाच नोकरी शोधणारे अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ यांच्या सदस्य संख्येमध्ये ऑगस्टमध्ये चांगली वाढ दर्शविली गेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ईपीएफओ सदस्यांची संख्या 16.99 लाखने वाढली आहे. श्रम मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी नव्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये भर पडली असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रालयाकडून उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये जवळपास 9.26 लाख नवे सदस्य ईपीएफओमध्ये नोंदणी झाले आहेत. यामध्ये 18 ते 25 वर्ष वयाचेच अधिक करुन आहेत. एकंदर नव्या सदस्यांची संख्या ऑगस्टमध्ये 58.36 टक्के आहे. यामध्ये पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्या युवकांची संख्या मोठी असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. पेरोल डाटाच्या माहितीनुसार जवळपास 11.88 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले होते आणि ते पुन्हा ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. यावर्षी ऑगस्ट 2022च्या तुलनेमध्ये 10 टक्के यामध्ये वाढ झाली आहे. या सदस्यांनी आपली नोकरी बदलली असल्याचे दिसून आले. गेल्या दोन महिन्यांमध्ये ईपीएफओमधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्यादेखील घटली असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.









