प्रतिनिधी / इस्लामपूर
शहरातील पेठ सांगली रस्त्यावरील डॉ.सचिन सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हलगर्जीपणामुळे पती धोंडीराम वसंतराव पाटील (४० रा.कापुसखेड) यांचा मृत्यू झाला. असल्याचे निवेदन पत्नी रुपाली यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. डॉ.सांगरुळकर यांची चौकशी करुन न्याय मिळावा, अन्यथा वरिष्ठ अधिकारी व न्यायालयात दाद मागू असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, धोंडिराम पाटील यांना १५ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे डॉ.सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र डॉ.सांगरुळकर यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच अनावश्यक औषधांचा डोस त्यांना दिल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. दरम्यान दि.२ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन पुरवठा खंडीत होवून धोंडिराम पाटील यांच्यासह अन्य ७ ते ८ रुग्ण अस्वस्थ होवून यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे माझ्या सह अन्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माझ्या पतीचा तडफडून मृत्यू झाला. हे मला दुर्दैवाने पहायला मिळाले. या सर्व घटनेला डॉ.सचिन सांगरुळकर यांच्यासह स्टाफ कारणीभूत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणा, नियोजनाचा अभाव आहे. याबाबत डॉ.सांगरुळकर यांना विचारणा केली असता, त्यांनी चुकीची व उडवाउडवीची उत्तरे दिली. यासर्व घटनेची चौकशी करुन मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसदारांना न्याय मिळावा, व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, जेणेकरुन भविष्यात आमच्या कुटुंबावर जी वेळ आली ती अन्य कोणावर येवू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. याबाबत आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे धोंडिराम यांच्या पत्नी रुपाली पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleएकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Next Article छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे








