कोरोना विषाणूचा फटका आता इस्रोलाही बसला आहे. टाळेबंदीमुळे इस्रोच्या सर्व केंद्रांमधील काम घटले आहे. याचबरोबर कोरोना संकटामुळे इस्रोचे बजेटही कमी झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोसाठी 2020-21 च्या पहिल्या तिमाहीच्या बजेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.
या कपातीमुळे इस्रोच्या कार्यप्रणालीवर किती प्रभाव पडणार हे सांगणे सद्यस्थितीत अवघड आहे. परंतु टाळेबंदी आणि निधीच्या चणचणीमुळे इस्रोचे अनेक प्रकल्प लांबणीवर पडू शकतात. म्हणजेच अनेक मोहिमा पुढील वर्षापर्यंत टाळल्या जाऊ शकतात.
मर्यादित खर्च करा
अर्थ मंत्रालयाच्या अधीन येणाऱया इकॉनॉमिक अफेयर्स विभागाच्या अर्थसंकल्प शाखेने अंतराळ विभागाला 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 15 टक्क्यांची कपात केली जात असल्याचे कळविले आहे. इस्रोचे बहुतांश वैज्ञानिक टाळेबंदीदरम्यान स्वतःच्या घरांमधूनच काम करत आहेत. सर्व मोहिमा रोखण्यात आल्या आहेत. काही मोहिमांचे काम पूर्ण झाले होते, परंतु सर्व प्रकल्प आणि मोहिमा जैसे थे स्थिती ठेवण्यास सांगण्यात आले आहे. इस्रोमधील सुमारे 17 हजार वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ स्वतःच्या घरांमधून काम करत आहेत.
मोहिमेवर पडणार नाही प्रभाव
इस्रोकडे प्रत्येक मोहिमेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. सर्वसाधारणपणे कुठलीच मोहीम थांबवावी लागू नये इतका निधी इस्रोकडे कायम असतो. पहिल्या तिमाहीच्या बजेटमध्ये करण्यात आलेल्या 15 टक्के कपातीचा मोहिमेवर प्रभाव पडणार नसल्याचे इस्रोच्या माजी वैज्ञानिकाने म्हटले आहे.
विलंब होण्याची शक्यता
इस्रोच्या सर्व मोहिमांचे वेळापत्रक तयार करत काम केले जाते. कुठल्याही कारणामुळे मोहिमेला विलंब झाल्यास पुढील मोहीम हाती घेतली जाते. यंदा इस्रोच्या मोहिमेला विलंब झाल्यास त्यासाठी टाळेबंदी कारणीभूत राहणार आहे.









