देशभरात होत असलेल्या निदर्शनांनंतरही इस्रायलने 18 ऑक्टोबरपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील टाळेबंदी सध्या हटविली जाणार नसल्याचे बेंजामीन नेतान्याहू सरकारने स्पष्ट केले आहे. आगामी काळात गरज भासल्यास टाळेबंदीची मुदत वाढविली जाणार आहे. टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यासारखी स्थिती नसल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. परंतु काही अत्यावश्यक सुविधांमध्ये दिलासा देण्यात आला आहे. यादरम्यान ग्रॉसरी स्टोअर आणि मेडिकल स्टोअर्स सुरू राहणार आहेत. कुठलाही व्यक्ती घरापासून 1 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर जाऊ शकणार नाही. तसेच ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे.
ब्राझील : लसचाचणी तात्पुरती स्थगित
जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकन कंपनीने ब्राझीलमधील देखील स्वतःच्या लसीची चाचणी रोखली आहे. यासंबंधी अधिक माहिती दिली जाऊ शकत नाही, परंतु सद्यकाळात लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी रोखली जात असल्याचे ब्राझिलियन हेल्थ एजेन्सीने म्हटले आहे. अमेरिकेत एक स्वयंसेवक लस चाचणीनंतर गंभीर आजारी झाल्याने ही चाचणी रोखण्यात आली आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचेही पथकही ब्राझीलमध्ये पोहोचणार आहे. हे पथक विशेषकरून दाट लोकवस्तीच्या भागात संक्रमण रोखण्याची रणनीति तयार करण्यास ब्राझीलला मदत करणार आहे









