जेरूसलेममध्ये युद्धसदृश स्थिती
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील तणाव टोकाला पोहोचला आहे. पॅलेस्टाईनच्या उग्रवाद्यांनी गाझाच्या दिशेकडून अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. त्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा दलांनीही मंगळवारी सकाळी जोरदार हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 9 मुलांसह 22 जण मारले गेले आहेत. मागील 24 तासांमध्ये जेरूसलेम आणि वेस्ट बँक क्षेत्रात इस्रायलच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या संघर्षात 700 हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. यातील 500 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
मंगळवारी सकाळी झालेल्या रॉकेट हल्ल्यात 6 नागरिक जखमी झाल्याची माहिती इस्रायलच्या सैन्याने दिली आहे. जेरूसलेमवर पॅलेस्टाईन आणि इस्रायल दोघांकडून दावा करण्यात येत असल्याचे हिंसाचार होत आहे. अलिकडच्या काळात पॅलेस्टिनी निदर्शक आणि इस्रायल पोलीस यांच्यातील संघर्षामुळे जेरूसलेम येथील तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. गाझाकडून इस्रायलच्या दिशेशने रात्रभर अनेक रॉकेट डागण्यात आल्यावर पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयांशी चर्चा केली आहे.
गाझा पट्टीवर कार्यरत उग्रवादी गट हमासने रॉकेट हल्ले सोमवार संध्याकाळपासुन सुरू केले होते. मंगळवार सकाळपर्यंत हमास आणि अन्य उग्रवादी गटांकडून इस्रायलच्या दिशेने 200 हून अधिक रॉकेट डागण्यात आले आहेत. दुसरीकडे गाझामध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात अनेक जण मारले गेले आहेत.
हवाई हल्ल्यांद्वारे हमासच्या 3 सदस्यांना लक्ष्य केल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले आहे. इस्रायल ‘मोठय़ा शक्तिनिशी प्रत्युत्तर देणार’ अशी शपथ पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी घेतली आहे. जेरूसलेम दिनी गाझामध्ये दहशतवादी संघटनांनी एक लाल रेषा ओलांडली आहे आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









