उत्तर इस्रायलमध्येही अग्निबाण हल्ला, बायडेन आज इस्रायलला भेट देणार
वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष 11 व्या दिवशीही सुरु राहिला आहे. इस्रायल सध्या हे युद्ध दोन आघाड्यांवर करत आहे. दक्षिणेकडे हमासशी तर उत्तरेकडे हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेशी हा संघर्ष केला जात आहे. मंगळवारी इस्रायलने दक्षिण गाझापट्टीत जोरदार बाँबहल्ले केले. त्यात हमासचा एक म्होरक्या मारला गेला. तसेच अन्य 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
या संघर्षात आतापर्यंत 4 हजार 300 जणांचा बळी दोन्ही पक्षांकडून पडला आहे. गाझापट्टीत 2,800 हून अधिक मृत्यू झाले असून इस्रायलचे 1,400 हून अधिक नागरीक बळी पडले आहेत. इस्रायल आणि अन्य देशांचे 199 नागरीक सध्या हमासच्या ताब्यात आहेत. या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
लेबेनॉनवर हल्ले
लेबेनॉनमध्ये असणाऱ्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने मंगळवारी सकाळी इस्रायलच्या सीमारेषेवरील काही चौक्यांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामध्ये दोन चौक्यांची हानी झाल्याचे वृत्त आहे. तसेच इस्रायलच्या आतल्या भागात या संघटनेने काही क्षेपणास्त्रे सोडल्याचे वृत्त आहे. मात्र, इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेने ही सर्व क्षेपणास्त्रे निकामी केली. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने लेबेनॉन आणि हिजबुल्ला यांच्या अनेक स्थानांवर भीषण बाँबहल्ला केला. यात लेबेनॉनची अनेक सेनास्थाने नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला. इस्रालयने हमासवरही गाझापट्टीत मोठा हल्ला केला.
बायडेन भेट देणार
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन इस्रायला आज बुधवारी भेट देणार आहेत. ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी परिस्थितीवर चर्चा करतील. त्यानंतर अमेरिका धोरण ठरविण्यासंबंधी निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमेरिकेने या संघर्षात इस्रायलला पूर्ण समर्थन दिले असले तरी इस्रायलने गाझा पट्टीत शिरण्याचा प्रयत्न करुन नये असा सल्लाही दिला आहे. या सर्व मुद्द्यांवर बायडेन यांच्याशी नेतान्याहू यांची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इस्रायली सेना सज्ज
कोणत्याही क्षणी गाझापट्टीत शिरण्यास इस्रायली सेना सज्ज आहे, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, पूर्ण विचाराअंती गाझा पट्टीत शिरण्याचा निर्णय घेतला जाईल. गाझापट्टीत भुयारांमधून इस्रायली सैनिकांवर हमासच्या दहशतवाद्यांकडून हल्ला होऊ शकतो. त्यामुळे इस्रायलला जपून पावले टाकावी लागतील, अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. इस्रायलने मात्र, हमासचा खात्मा केल्याशिवाय युद्ध थांबविणार नसल्याची घोषणा इस्रायलने केली आहे.
अमेरिकेच्या 19 युद्धनौका सज्ज
इस्रायलला साहाय्य करण्यासाठी अमेरिकेच्या 19 युद्धनौका सज्ज असून त्यांनी भूमध्य समुद्रात प्रवेश केला आहे. यांमध्ये दोन मोठ्या विमानवाहू नौकाही आहेत. त्यामुळे अमेरिकाही आता पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. युद्धाची व्याप्ती वाढवू नका असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेने इराणला आणि इतर काही देशांना दिला आहे. मात्र, तो न मानल्यास अमेरिका युद्धात सक्रीय सहभाग घेऊ शकते, असेही अनेक युद्धतज्ञांचे मत आता बनत आहे.
ओलीसांना सोडण्याची तयारी
इस्रायलने हल्ले थांबविल्यास त्याच्या ओलिसांना हमास सोडून देईल असे इराणने स्पष्ट केले आहे. काही अटीही इराणने घातल्या आहेत. मात्र, इस्रायलने हल्ले थांबविण्यास नकार दिला आहे. उलट, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. अन्यथा आपल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला आहे. परिणामी, हा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे.
पुतीन-जिनपिंग भेट
मध्यपूर्वेतील परिस्थितीच्य पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतली. सध्यातरी चीन आणि रशिया यांनी या प्रकरणात तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसून येते. पण अमेरिका कोणता निर्णय घेणार यावर त्यांची भूमिका ठरणार असल्याचेही बोलले जाते. एकंदर, सर्व महासत्ता या प्रकरणात एकमेकींना जोखण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत, असे सध्याचे चित्र आहे. आगामी तीन-चार दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार असून संघर्षाचे भवितव्य ठरेल, अशी चर्चा आहे.
दिवसभरात…
ड हमास, हेजबुल्लाकडून इस्रायलवर अग्निबाण हल्ला, इस्रायलचे प्रत्युत्तर
ड अमेरिकेच्या अध्यक्षांच्या इस्रायलभेटीनंतर संघर्षाला निर्णायक रुप येणार
ड रशिया-अमेरिका सध्या तटस्थ, पण केव्हाही सक्रीय होण्याची शक्यता
ड इस्रायलची सेना गाझापट्टीत प्रवेशसाठी सज्ज, विचार करुन निर्णय घेणार









