ऑनलाईन टीम / तेल अविव :
इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. आज सकाळीही दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या दोन्ही देशांमधील संघर्ष कमी व्हावा, यासाठी अमेरिकेचे राजदूत हॅडी आम्रा तेल अविवमध्ये दाखल झाले आहेत. इस्राईलमधल्या अमेरिकी दूतावासाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या बैठक होणार आहे. त्यापूर्वीच आम्रा तेल अविवमध्ये दाखल झाले आहेत. इस्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्रा हे इस्राईल, पॅलेस्टाईन आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून युद्धबंदीसाठी प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, मागील पाच दिवसांपासून इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरू आहे. इस्राईलने शनिवारी पहाटे गाझाच्या पश्चिमेकडे असलेल्या शरणार्थी शिबिरावर हल्ला केला. यात 7 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल गाझातील अतिरेक्यांनीही इस्राईलच्या बीरशेबा शहराला लक्ष्य करून रॉकेट हल्ला केला.









