पहिली कसोटी, दुसरा दिवस : भारताच्या 165 धावांना उत्तर देताना न्यूझीलंडची दिवसअखेर 5 बाद 216 पर्यंत मजल
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
पुनरागमनवीर इशांत शर्माची (3-31) वाघाचे काळीज दर्शवणारी भेदक गोलंदाजी आणि केन विल्यम्सनची 89 धावांची खणखणीत खेळी, येथील वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवसाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. प्रारंभी, भारताचा पहिला डाव सर्वबाद 165 धावांवरच आटोपल्यानंतर यजमान किवीज संघाने दिवसअखेर 5 बाद 216 धावांपर्यंत मजल मारली व 51 धावांची आघाडी प्राप्त केली. खेळ थांबला, त्यावेळी वॅटलिंग 14 तर ग्रँडहोम 4 धावांवर खेळत होते.
इशांतने पाठीच्या दुखण्यातून सावरल्यानंतर ज्या जिद्दीने गोलंदाजी केली, त्याला तोड नव्हती. इशांतने 15 षटके टाकत त्यात 6 निर्धाव व 31 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवले. सहकारी जलद गोलंदाज मोहम्मद शमीने (17 षटकात 1-61) दिवसातील आपल्या शेवटच्या स्पेलमध्ये विल्यम्सनचा काटा दूर सारला. हेन्री निकोल्सला (62 चेंडूत 17) बरेच झगडावे लागले. त्यामुळे देखील विल्यम्सनची शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचत असताना एकाग्रता भंगली.
दिवसभरात उत्तम मारा करणाऱया रविचंद्रन अश्विनने (21 षटकात 1-60) शेवटच्या तासात निकोल्सला दुसऱया स्लीपमधील विराटकरवी झेलबाद केले. विल्यम्सनने स्क्वेअर ऑफ द विकेट बरेच उत्तम फटके खेळले. शिवाय, बुमराहला (18.1 षटकात 0-62) कव्हर ड्राईव्हच्या फटक्यावर बऱयाचदा सीमारेषेच्या दिशेने पिटाळले. त्याच्या 153 चेंडूतील खेळीत 11 चौकारांचा समावेश राहिला. विशेषतः बुमराहचा त्याने बराच समाचार घेतला.
त्या तुलनेत टॉम लॅथमने (11) यष्टीमागे पंतकडे झेल दिल्यानंतर इशांतला ब्रेकथ्रू मिळाला. दुसरा सलामीवीर टॉम ब्लंडेलही (30) इशांतचाच बळी ठरला. विल्यम्सन व टेलर यांनी नंतर 93 धावांची भागीदारी साकारली. इशांतने पुढे आपल्या तिसऱया स्पेलमध्ये रॉस टेलरला शॉर्ट लेगवरील पुजाराकरवी झेलबाद केले.
‘40 षटकानंतर कुकाबुरा चेंडू नरम-सौम्य होतो आणि त्यानंतर क्रॉस-सीमने गोलंदाजी केल्यास आजच्यासारखे लाभ पहायला मिळतात’, अशी प्रतिक्रिया अनुभवी इशांतने येथे दिली. 22 व्या शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या विल्यम्सनला शमीच्या गोलंदाजीवर कव्हर ड्राईव्ह मारण्याचा मोह नडला आणि बदली खेळाडू रविंद्र जडेजाने अप्रतिम झेल टिपत विल्यम्सनची शमी संपुष्टात आणली.
साऊदी-जेमिसनचे प्रत्येकी 4 बळी
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा पदार्पणवीर काईल जेमिसन (4-39) व अनुभवी टीम साऊदी (4-49) यांनी प्रत्येकी 4 बळी घेतल्यानंतर भारताचा डाव 68.1 षटकात जेमतेम 165 धावांमध्येच गुंडाळला गेला. प्रारंभी, 5 बाद 122 धावांवरुन डावाला सुरुवात करणाऱया भारताला या दिवसाच्या खेळात आणखी केवळ 43 धावांची भर घालता आली.
ऋषभ पंतने (19) षटकारासह आक्रमक सुरुवात केली. पण, अजिंक्य रहाणेसह (138 चेंडूत 5 चौकारांसह 46) एकेरी धाव घेताना प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर पंतला धावचीत होत परतावे लागले. साऊदीने नंतर खांद्यापर्यंत उसळलेल्या चेंडूवर रहाणेला बाद केले. शमीच्या 21 धावांच्या खेळीमुळे भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करता आला.
धावफलक
भारत पहिला डाव : पृथ्वी शॉ त्रि. गो. साऊदी 16 (18 चेंडूत 2 चौकार), मयांक अगरवाल झे. जेमिसन, गो. बोल्ट 34 (84 चेंडूत 5 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. वॅटलिंग, गो. जेमिसन 11 (42 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली झे. टेलर, गो. जेमिसन 2 (7 चेंडू), अजिंक्य रहाणे झे. वॅटलिंग, गो. साऊदी 46 (138 चेंडूत 5 चौकार), हनुमा विहारी झे. वॅटलिंग, गो. जेमिसन 7 (20 चेंडूत 1 चौकार), ऋषभ पंत धावचीत (पटेल) 19 (53 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रविचंद्रन अश्विन त्रि. गो. साऊदी 0 (1 चेंडू), इशांत शर्मा झे. वॅटलिंग, गो. जेमिसन 5 (23 चेंडू), मोहम्मद शमी झे. ब्लंडेल, गो. साऊदी 21 (20 चेंडूत 3 चौकार), बुमराह नाबाद 0. अवांतर 4. एकूण 68.1 षटकात सर्वबाद 165.
गडी बाद होण्याचा क्रम
1-16 (पृथ्वी शॉ, 4.2), 2-35 (पुजारा, 15.3), 3-40 (विराट, 17.5), 4-88 (मयांक, 34.3), 5-101 (विहारी, 41.1), 6-132 (पंत, 58.2), 7-132, 8-143 (रहाणे, 62.3), 9-165 (इशांत, 67.3), 10-165 (शमी, 68.1).
गोलंदाजी
टीम साऊदी 20.1-5-49-4, ट्रेंट बोल्ट 18-2-57-1, कॉलिन डे ग्रँडहोम 11-5-12-0, जेमिसन 16-3-39-4, अजाज पटेल 3-2-7-0.
न्यूझीलंड पहिला डाव : टॉम लॅथम झे. पंत, गो. इशांत 11 (30 चेंडू), टॉम ब्लंडेल त्रि. गो. शर्मा 30 (80 चेंडूत 4 चौकार), केन विल्यम्सन झे. बदली खेळाडू (जडेजा), गो. शमी 89 (153 चेंडूत 11 चौकार), रॉस टेलर झे. पुजारा, गो. इशांत 44 (71 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), हेन्री निकोल्स झे. कोहली, गो. अश्विन 17 (62 चेंडूत 2 चौकार), बीजे वॅटलिंग खेळत आहे 14 (29 चेंडूत 1 चौकार), कॉलिन डे ग्रँडहोम नाबाद 4 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7. एकूण 71.1 षटकात 5-216.
गडी बाद होण्याचा क्रम
1-28 (लॅथम, 10.2), 2-73 (ब्लंडेल, 26.4), 3-166 (रॉस टेलर, 52.1), 4-185 (केन विल्यम्सन, 62.4), 5-207 (निकोल्स, 69.5).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 18.1-4-62-0, इशांत शर्मा 15-6-31-3, मोहम्मद शमी 17-2-61-1, रविचंद्रन अश्विन 21-1-60-1.
साऊदी म्हणतो, ऋषभ पंत धावचीत झाला, तोच टर्निंग पॉईंट!
‘ऋषभ पंतने धडाकेबाज षटकार खेचला, त्यावेळी तो धोकादायक ठरु शकतो, याची आम्हाला जाणीव झाली. पण, आमच्या सुदैवाने तो धावचीत झाला आणि माझ्या मते तोच दिवसभरातील टर्निंग पॉईंट ठरला’, असे न्यूझीलंडचा जलद गोलंदाज टीम साऊदी म्हणाला. दिवसाचा खेळ झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला तो संबोधित करत होता.
ऋषभ पंत बाद झाल्यानंतर रहाणेकडे आक्रमणावर भर देण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता आणि याच प्रयत्नात तो ही बाद झाला. त्याचा उल्लेख करताना साऊदी म्हणाला, ‘दुसऱया बाजूने फलंदाज बाद करता आले तर रहाणेकडे आक्रमकरित्या खेळण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, याची आम्हाला उत्तम जाणीव होती आणि नेमके तसेच झाले. स्विंगचा आम्हाला पुरेपूर लाभ करुन घेता आला. खेळाच्या तिसऱया दिवशी काही उत्तम भागीदारी साकारत एककलमी वर्चस्व गाजवण्याचा आमचा प्रयत्न असेल’.









