तांत्रिक बिघाडामुळे अपघाताचा अंदाज : अपघातग्रस्त विमान युक्रेन एअरलाईन्सचे
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणची राजधानी तेहरानमध्ये विमान अपघातात 176 प्रवासी ठार झाले आहेत. युक्रेन एअरलाईन्सचे बोईंग 737 हे विमान उड्डाणानंतर अवघ्या काहीक्षणात दुर्घटनाग्रस्त झाले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमान तेहरानहून युक्रेनची राजधानी कीव्हकडे निघाले होते.
दरम्यान, इराणच्या बचाव व तपास दलाला या विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले असून लवकरच अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे इराणच्या नागरी विमान प्राधिकरणचे प्रवक्ते रजा जाफरजादेह यांनी म्हटले आहे. तर इराण आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने चर्चेचा विषय ठरली आहे. तथापि अपघाताबाबत लगेच निश्चित सांगितले जाऊ शकत नसल्याचेही इराणने म्हटले आहे. मात्र या अपघातानंतर गेल्या काही वर्षांपासून अपघाताच्या दुष्टचक्रात अडकलेल्या बोईंग विमानाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह ठळक झाले आहे.
तिसऱया मिनिटाला एका इंजिनला आग
इराणच्या परिवहन प्रवक्ते कासिम बिनियाज यांनी दिलेल्या माहितीनुसार तेहरानमधील इमाम खोमनेई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण केले. तथापि अवघ्या तीन मिनिटातच विमानाच्या एका इंजिनाला आग लागली. आणि विमानाचा तळाशी संपर्क सुटला व डेटा पाठवणे बंद झाले.
सर्व 176 जण ठार
नागरी विमान वाहतूक प्राधिकरणचे प्रवक्ते रजा जाफरजादेह म्हणाले, तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागात हा अपघात झाला. घटनेनंतर तत्काळ बचाव व तपास पथकाचे कर्मचारी दाखल झाले. तथापि त्यांना कोणीही जीवित स्वरुपात आढळून आले नाही. या विमानाचे दोन्ही ब्लॅकबॉक्स मिळाले आहेत. या विमानात असणारे 82 इराणी नागरिक आणि 63 कॅनडाचे प्रवासी होते. तसेच अन्य कर्मचारी वर्ग असे सर्व मिळून 176 जण ठार झाले आहेत.
बोईंगच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून बोईंग 737 विमानांचे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे काही विमान कंपन्या हे विमान आपल्या ताफ्यातून कमी करण्याबाबत विचार करत आहेत. त्यातच बुधवारी पुन्हा बोईंग विमानालाच तांत्रिक बिघाडाने अपघात झाल्याने बोईंगच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









