प्रतिनिधी/ कराड
इराण येथे कैदी बनवून डांबून ठेवलेल्या मर्चंट नेव्हीतील दोन भारतीय युवकांची तब्बल नऊ महिन्यांनी सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे ते भारतात सुखरूप परतले आहेत. खासदार पाटील यांनी समयसूचकता बाळगून तात्काळ केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत.
आनंदराव जगन्नाथ पाटील (रा. शिरवडे, ता. कराड) यांचा मुलगा वीरेंद्र आनंदराव पाटील व भरत रवींद्र पाटील (रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे दोन युवक मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होते. वर्षापूर्वी मुंबईच्या एका एजन्सीमार्फत लिब्रा नावाच्या जहाजातून ते कामानिमित्त इराणला गेले होते. इराणच्या समुद्र हद्दीमध्ये गेल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून इराण सैन्याने त्या जहाजासह जहाजावरील अन्य दहा ते बारा व्यक्तींना अटक केली होती. त्यामध्ये या दोन युवकांचा देखील समावेश होता. अटक केल्यानंतर त्यांना तेथील बुशर बंदर येथील तुरुंगात बंदिस्त करून ठेवले होते. तसेच त्यांच्या जवळ असणारा मोबाईल व पासपोर्टसुद्धा काढून घेतले होते. अनपेक्षितपणे झालेल्या या कारवाईने सदर युवकांचा घरच्यांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता.
दरम्यान तुरंगातील त्यांच्या एका इराणच्या मित्राला भेटण्यासाठी त्याची बहीण आली होती. तिला थोडेफार उर्दू समजत असल्याने या दोन तरुणांशी मोडकातोडका सवांद साधून तिच्या मोबाईलवरून व्हाटस्ऍपद्वारे भारतातील त्यांच्या घरी संदेश पाठवला. त्यामुळे तीन महिन्यानंतर या घटनेची माहिती सदर तरुणांच्या नातेवाईकांना समजली. मात्र स्पष्ट व सखोल माहिती नसल्यामुळे परदेशात अडकलेल्या आपल्या मुलांना कसे सोडवायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता.
आनंदराव पाटील यांनी तात्काळ खा. श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांची भेट घेऊन झालेल्या प्रकारची हकीकत सांगितली. खासदार पाटील यांनी भारताचे पूर्वीचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांना सांगून सामाजिक कार्यकर्ते संजय पराशर यांच्या मदतीने व पाठपुरावा करून त्या दोघांची सुटका करण्यात आली. त्यानंतर इतर कायदेशीर सोपस्कर पार पडल्यानंतर त्यांचे मायदेशात आपल्या घरी सुखरूप आगमन झाले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथमता खा. श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
माझा मुलगा व त्याच्या मित्राची खा. श्रीनिवास पाटील यांच्यामुळे सुटका झाली आहे. सारंग पाटील यांचे सहकार्य लाभल्याने ते सुखरूप घरी परतले आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी असून आभार व्यक्त करतो, असे आनंदराव जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.