भक्तिमार्ग, संस्कृतीचा मार्ग सोडून गोमंतकीय विकृतीच्या मार्गावर जाण्याच्या दिशेने आहे. या सर्वांपासून अलिप्त करायचे असेल, मनःशांती मिळवायची असेल तर कीर्तनासारखे प्रकार गोमंतकीयांमध्ये रुजविणे योग्य ठरते. याकामी ह.भ.प. व्ही. जी. शेटगावकर तसेच अन्य गोमंतकीय कीर्तनकारांचे प्रयत्न सार्थकी ठरोत.
गोव्यातील नामवंत कीर्तनकार म्हणून ह.भ.प. विष्णूबुवा शेटगांवकर यांचा नामोल्लेख करावा लागेल. त्यांचे ‘इये कीर्तन विद्या मंदिरी’ हे कीर्तनावरील आधारित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. मांद्रे साहित्य संगमच्या मासिक कार्यक्रमात हा पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. सुलभ व रसाळ भाषेत त्यांनी लेखन केलेले असून पूर्वरंग व आख्यान यांचा समन्वय साधण्यात आलेला आहे. हे पुस्तक नवोदित कीर्तनकार, कीर्तनप्रेमी, अभ्यासक, प्रवचनकार यांना निश्चितच उपयुक्त, मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे. ह.भ.प. मुकुंदराज मडगावकर यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाच्या वाचनाने नवोदित कीर्तनकारांना मार्गदर्शनाची वाट, प्रेरणा व उत्साह मिळेल, अशी अपेक्षा आहे. या पुस्तकातील नऊ पूर्वरंग व नऊ आख्याने यांचा संच नवोदित तसेच अभ्यास कीर्तनकारांना मार्गदर्शक ठरणारा आहे. कीर्तनात प्रथमतः मंगलाचरण, नंतर भजन, नंतर प्रतिपाद्य विषयाचे मूळ पद, आद्यपन किंवा अभंग त्यानंतर निरूपण पूर्वरंग व शेवटी उत्तर रंगात आख्यान असते. त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. मध्येमध्ये मर्म विनोदही आहेत. प्रत्येक आख्यानाला साजेसा पूर्वरंग आहे.
एक आदर्श शिक्षक, लोकप्रिय कीर्तनकार, प्रभावी वक्ते, सुरेल सूत्रसंचालक, शैलीदार निवेदक, हौशी नाटय़कलाकार, दिग्दर्शक, साहित्यप्रेमी, समाजसेवक तसेच आघाडीचे कीर्तनकार म्हणून मोरजी येथील व्ही. जी. शेटगावकर ऊर्फ विष्णुबुवा गणेश शेटगावकर (वय 67) यांनी नावलौकिक मिळविला आहे. बिल्वदल-सांखळीतर्फे केरी-फोंडा येथे 2019 मध्ये आयोजित केलेल्या पाचव्या कीर्तन संमेलनात त्यांना मानाचा नारदमुनी कीर्तन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
गेल्या 40 वर्षांत त्यांनी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकाच्या काही भागात तीन हजारांहून अधिक कीर्तने सादर केली आहेत. त्यांचे कीर्तन केवळ मंदिरापुरते मर्यादित न राहता मंदिराप्रमाणेच मठ, गृहस्थाश्रम, शाळा, कॉलेज व संस्थांमध्ये झाले आहे. मनमिळावू, हसऱया व विनोदी स्वभावामुळे ते अधिकाधिक लोकप्रिय झालेले आहेत.
विष्णुबुवांनी कीर्तनाचे प्रारंभिक धडे ह.भ.प. दत्तदासबुवा घाग यांच्याकडून घेतलेले आहेत. त्यानंतर एक वर्ष ह.भ.प. रामचंद्रबुवा कऱहाडकर यांच्याकडून श्री समर्थ रामदास प्रतिष्ठान, कपिलेश्वरी-फोंडा येथील कीर्तन महाविद्यालयातून मार्गदर्शन घेतले. हरिभक्त परिषदेचे कीर्तनकार स्नेहसंमेलन असो अथवा कला अकादमीचा कीर्तन महोत्सव किंवा कीर्तन कार्यशाळा असो बुवांची न चुकता तेथे उपस्थिती असते. सांगली व कोल्हापूर येथील अखिल भारतीय कीर्तन संमेलनातही ते सहभागी झाले आहेत. कीर्तन प्रशिक्षण शिबिरातही बुवा उपस्थित राहिलेले आहेत तसेच नवोदित कीर्तनकारांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे व अजूनही करीत आहेत.
कला अकादमी पणजी आयोजित राज्यस्तरीय कीर्तन निरुपण स्पर्धेत विष्णुबुवांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. हरिभक्त परिषद आयोजित पूर्वरंग निरुपण स्पर्धेत त्यांना दोनदा प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. पेडणे विभागीय आरोग्य केंद्र आयोजित एड्सविषयक खुल्या गटातील स्पर्धेत बुवांनी सादर केलेल्या लघुकीर्तनास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. पौष्टिक आहार, व्यसनमुक्ती, साक्षरता प्रसार, पर्यावरण रक्षण, प्लास्टिक हटाव, स्वच्छ भारत-सुंदर भारत, बेटी बचाव, देशभक्ती, राष्ट्रीय एकता यासारख्या राष्ट्रीय ज्वलंत समस्यांवर त्यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले आहे. शालेय स्काऊट गाईड कॅम्प, उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरातही त्यांचे कीर्तन कार्यक्रम झाले आहेत.
विष्णुबुवांनी अनेक महनीय पदे भूषवलेली आहेत. गोवा राज्य सांस्कृतिक विकास समितीचे ते सदस्य होते. हरिभक्त परिषदेच्या बिंबल-सत्तरी येथील कीर्तनकार स्नेहसंमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. श्री ब्रह्मानंद कीर्तन विद्यालय, तपोभूमीचे त्यांनी उपाध्यक्षपद सांभाळले आहे. याशिवाय मोरजी येथील कीर्तनकार स्नेहसंमेलनाचे सचिव तर श्री मोरजाई देवी संस्थानचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. सध्या ते हरिभक्त परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षण क्षेत्रातही विष्णुबुवांनी 42 वर्षे शिक्षक म्हणून मोरजी येथील विद्याप्रसारक हायस्कूलमध्ये विद्यादानाचे पवित्र कार्य केले आहे. आठ वर्षे मुख्याध्यापक व दहा वर्षे पर्यवेक्षकाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे. नाटय़क्षेत्रात गेली एकूण 50 वर्षे ते हौशी नाटय़ रंगभूमीवर मोरजी येथील श्री दाडोबा प्रासादिक नाटय़मंडळातर्फे सातत्याने विविध प्रकारच्या भूमिका सादर करीत आहेत. वयाच्या 17व्या वर्षांपासून त्यांनी हौशी रंगभूमीवर पदार्पण केले. काही नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केलेले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी एकांकिकांना राज्यस्तरावर तीनवेळा प्रथम पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. नवोदित नाटककारांच्या नाटकांवरही त्यांनी विवेचन व मार्गदर्शन केलेले आहे.
सांस्कृतिक, शैक्षणिक, सांगीतिक, साहित्यिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ते करीत असतात. गीत रामायण, गीत दत्तात्रेय, गीत साई या कार्यक्रमांचे निवेदन करतात. कविता, कथा, लेख, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण लेखनाची त्यांना आवड आहे. त्यांच्या कविता, निबंध, प्रवासवर्णनाला राज्यस्तरावरील पारितोषिकेही प्राप्त झालेली आहेत. त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक संस्थांकडून त्यांचे सत्कार झाले आहेत.
विद्यमान परिस्थितीवर नजर टाकल्यास गोव्यातील शांतता हरवत चालल्याचे दिसून येते. बरीचशी तरुणाई व्यसनांच्या गर्तेत सापडली आहे. गोव्याच्या खा, प्या, मजा करा संस्कृतीमुळे समाज भोगमार्गाचा अवलंब करू लागला असून विद्यार्थ्यांचेही मनोधैर्य खचू लागले आहे. सध्या गोव्यात अपघातांचे, खुनांचे, चोरीचे, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. कॅसिनोसारखी जुगार संस्कृती रूजू लागली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे भक्तिमार्ग, संस्कृतीचा मार्ग सोडून गोमंतकीय विकृतीच्या मार्गावर जाण्याच्या दिशेने आहे. या सर्वांपासून अलिप्त करायचे असेल, मनःशांती मिळवायची असेल तर समाजप्रबोधन कार्य करणाऱया कीर्तनासारखे प्रकार गोमंतकीयांमध्ये रुजविणे योग्य ठरते. याकामी ह.भ.प. व्ही. जी. शेटगावकर तसेच अन्य गोमंतकीय कीर्तनकारांचे प्रयत्न सार्थकी ठरोत. यासाठी ‘इये कीर्तन विद्या मंदिरी’सारखी पुस्तके मार्गदर्शक ठरणार आहेत.








