राजकीय भवितव्य डळमळीत, 31 ला चर्चा होणार
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रानखान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाची बऱयाच दिवसांपासून चर्चा होत होती. आता इम्रानखानसमोर बहुमत सिद्ध करण्याचे जटील आव्हान उभे ठाकले आहे. सोमवारी पाक संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला.
या प्रस्तावामुळे इम्रानखान यांना त्यांच्या राजकीय कार्यकाळातील सर्वात कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या प्रस्तावावर दोन ते तीन दिवस चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रस्ताव मतदानाला टाकला जाईल. 31 मार्चला संसदेत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बहुमतसाठी किमान 172 मते मिळविण्याची आवश्यकता असून सध्या इम्रानखान सरकार अल्पमतात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मित्रपक्षांनी तसेच स्वतःच्या खासदारांनीही पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक सदस्य बेपत्ता असल्याचीही चर्चा आहे. अविश्वास प्रस्ताव मांडल्यानंतर संसदेचे कामकाज नियमाप्रमाणे 31 मार्च दुपारी चार वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
इम्रानखाच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या साधारणतः 24 संसदसदस्यांनी पाठिंबा काढल्याची घोषणा केली आहे. मात्र ते ऐनवेळी कोणता पवित्रा घेतात यावर इम्रान यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्याचप्रमाणे मित्र पक्षांच्या 23 सदस्यांनीही पाठिंबा देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यांची भूमिका मतदानापर्यंत ठाम राहील का, असाही प्रश्न आहे. एकंदर स्थिती दोलायमान आहे. इम्रानखान यांना बहुमत सिद्ध करणे सोपे नाही, असे जाणकारांचे मत आहे.









