मरीयम शरीफ यांची खोचक टिप्पणी
लाहोर
पाकिस्तानात विरोधी पक्षांची आघाडी (पीडीएम) इम्रान खान सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. इम्रान सरकारशी आता ‘आर-पार’ची लढाई आहे. 13 डिसेबर रोजी कुठल्याही स्थितीत लाहोरमध्ये सभा घेऊ. इम्रान यांनी ही सभा रोखणार असल्याचे म्हटले असले तरीही ही सभा होणारच. परंतु इम्रान ज्याप्रकारे काम करत आहेत, ते पाहता त्यांचे नाव बदलून ‘आज्ञाधारक खान’ ठेवण्यात यावे अशी खोचक टिप्पणी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम यांनी केली आहे.
लोक रस्त्यांवर उतरले असून या बनावट सरकारपासून त्यांना मुक्ती हवी आहे. 11 विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेते यासाठी तयार आहेत. आमचे नेते संसदेतून राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे मरियम म्हणाल्या.
विरोधी पक्षांचा मोर्चा लाहोरमधील मीनार-ए-पाकिस्तानपासून सुरू होणार आहे. परंतु इम्रान यांनी विरोधी पक्षांना मोर्चा न काढण्याची ताकीद दिली आहे. मोर्चात सामील होणाऱयांवर गुन्हा दाखल केला जाईल असे इम्रान यांनी म्हटले आहे.









