प्रतिनिधी /बेळगाव
स्वच्छता कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत क्वॉर्ट्सच्या छताच्या दुरुस्तीसाठी 20 हजार रुपयांचे सहाय्य धन देण्यात येत आहे. मात्र याकरिता प्रतिसाद मिळाला नाही. तसेच एका कुटुंबासाठी एकच क्वॉर्ट्स राहण्यासाठी उपलब्ध केले जाईल, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी दिली.
स्वच्छता कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी महापालिका कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सफाई मजदूर संघटनेचे पदाधिकारी व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. शहराची स्वच्छता करण्यासाठी काम करणाऱया कामगारांसाठी महापालिकेकडून विविध योजना राबविण्यात येत असून या अंतर्गत राहण्यासाठी क्वॉर्ट्स देण्यात आले आहेत. तसेच काही कर्मचाऱयांना भूखंड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काही कुटुंबांकडे दोन दोन क्वॉर्ट्स आहेत. अशा कुटुंबांना एकच क्वॉर्ट्स दिले जातील, असे महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी स्पष्ट केले.
सध्या काही कामगारांच्या ताब्यात दोन क्वॉर्ट्स आहेत. त्यामुळे तशी तरतूद महापालिकेत नाही, असे स्पष्ट केले. कामगारांकडून एच. आर. कपात केला जातो. ही रक्कम कपात करू नये, अशी मागणी सफाई मजदूर संघटनेकडून करण्यात आली. या रक्कमेतून क्वॉर्ट्सची दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. सध्या क्वॉर्ट्समध्ये राहणाऱया इमारतीच्या छताच्या दुरुस्तीसाठी 20 हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. याकरिता अर्ज करण्याचे आवाहन केले होते. पण एकाही कामगाराने अर्ज केला नाही. जर दुरुस्तीचे काम करणार असल्यास संपर्क साधावा, असेही आयुक्तांनी सांगितले.
त्याचप्रमाणे स्वच्छता कामगारांच्या विविध समस्यांचे निवारण करण्याची मागणी सफाई मजदूर संघटनेच्यावतीने माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी केली. तसेच यापूर्वी झालेल्या बैठकांचे इतिवृत्त तयार करण्यात आले नाही. याबाबत पदाधिकाऱयांनी जाब विचारला व पुढील बैठकीत सर्व इतिवृत्त पूर्ण करावे, अशी सूचना केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विजय निरगट्टी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ, पर्यावरण सहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी, पर्यावरण सहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, पर्यावरण सहाय्यक प्रवीण किलारी आदींसह अधिकारी उपस्थित होते.









