वार्ताहर/ किणये
इनाम बडस येथील एका शेतकऱयाच्या घरच्या दरवाजाची कडी तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश करून साहित्य लांबविले. सदर चोरीचा प्रकार रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे.
कृष्णा पांडुरंग पाटील असे घरमालकाचे नाव आहे. त्यांचे गावाशेजारील शिवारात घर आहे. त्या घरात जनावरांसाठी गोठा आहे. दुसऱया खोलीमध्ये शेतीसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले होते.
रविवारी रात्री आठच्या दरम्यान कृष्णा पाटील दूध काढून गावातील आपल्या घरी गेले होते. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरटय़ांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व दहा पोती रासायनिक खत, जनावरांच्या खाद्याची पोती तसेच लोखंडी तारा व रोख पाच हजाराची रक्कम लांबविली आहे.
कृष्णा पाटील रात्री अकराच्या दरम्यान जनावरांना चारा घालण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे गावातील शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पश्चिम भागामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वीच बेळगुंदी येथील तीन दुकाने फोडण्यात आली होती. आता एका शेतकऱयाच्या घरावरच डल्ला मारल्याने पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे..









