अजब प्रकारामुळे लोक चिंतेत
हिवाळय़ादरम्यान अनेक देशांमध्ये हिमवृष्टी होत असल्याचे वृत्त समोर येते. छायाचित्र आणि चित्रफितींमध्ये अनेक शहरे पांढऱया बर्फाने आच्छादली गेल्याचे दिसून येते. अनेक लोकांनी हिमवृष्टी प्रत्यक्ष अनुभवली देखील असेल. परंतु कधीच काळी हिमवृष्टी होण्याचा प्रकार पाहिला आहे का? हे वाचून अजब वाटेल परंतु रशियाच्या एका भागात काळी हिमवृष्टी लोकांसाठी अडचणीची ठरली आहे.
रशियाच्या सायबेरियातून अजब हिमवृष्टीचे छायाचित्र समोर आले आहे. सायबेरियातील एका दुर्गम भागात काळी हिमवृष्टी होत असल्याने लोक त्रस्त आहेत. प्रदूषणाचा मार सहन करावा लागत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. राख आणि काळय़ा बर्फाने आच्छादित मैदानात आमच्या मुलांना खेळावे लागत असल्याचे तेथील लोकांचे सांगणे आहे.
सायबेरियाच्या या भागात काळी हिमवृष्टी होण्यामागे कोळशामुळे फैलावणारे प्रदूषण कारणीभूत आहे. तेथे लोकांना उष्णता प्रदान करण्यासाठी कोळशाद्वारे चालणारा गरम पाण्याचा प्रकल्प असून त्याच्या धुळीमुळे प्रदूषण वाढले आहे. एका व्यक्तीने सायबेरियाच्या ओमसुचन गावातील व्हिडिओ शेअर केला असून त्यात काळा बर्फ दिसून येतो.

का होतेय काळी हिमवृष्टी?
सोव्हिएत युनियनचे अस्तित्व संपल्यावरही इथे काहीच बदलले नाही. पूर्वीसारखीच स्थिती असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. ओमसुक्चन आणि सेमचनमध्ये कोळशाद्वारे संचालित गरम पाण्याच्या प्रकल्पामुळे काळी हिमवृष्टी होतेय. उष्ण पाण्याचा प्रकल्प येथील घरांसाठी एक हीटिंग स्रोत असल्याचे अधिकाऱयांचे सांगणे आहे. या भागात सोने आणि कोळशाच्या खाणी आहेत.
समस्या वाढतेय
सायबेरियाच्या या भागात जानेवारी महिन्यात तापमान उणे 50 अंशांखाली पोहोचल्याने मोठय़ा प्रमाणात कोळसा जाळावा लागला. यामुळे या भागात बर्फावर काळा थर जमा झाला. उष्णता संयंत्रांना वीज पुरविणे आवश्यक आहे, जेणेकरून लोकांची घरे उबदार ठेवता येतील. धूर एकत्र करणारे उपकरण योग्यप्रकारे काम करत नसल्याने येथील लोक प्रदूषणाचा सामना करत असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे.









