सुंदर देश इटली वृद्ध होत चाललेली लोकसंख्या आणि घटत चाललेल्या जन्मदराला तोंड देत आहे. येथील कलैब्रिया क्षेत्रात लोकसंख्या खूपच कमी झाली आहे. याचमुळे सरकारने अन्य देशांमधील लोकांना तेथे स्थायिक करण्यासाठी विशेष ऑफर दिली आहे. या शहरात स्थायिक होण्यासाठी सरार 28 हजार युरो म्हणजेच सुमारे 24.76 लाख रुपये देणार आहे. पण येथे स्थायिक होण्यासाठी काही अटी मानाव्या लागणार आहेत.
इटलीच्या कलैब्रिया क्षेत्रात स्थायिक होण्यासाटी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱयांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या समस्येला तोंड देणाऱया कलैब्रिया क्षेत्रात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. स्थायिक होऊ इच्छिणाऱयांना अर्ज केल्याच्या 90 दिवसांमध्ये हा व्यवसाय सुरू करावा लागेल.
या ऑफरसाठी अर्जप्रक्रिया पुढील काही आठवडय़ांमध्ये कलैब्रिया क्षेत्राच्या वेबसाइटवर सुरू केली जाऊ शकते. याचबरोबर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देता येणार आहे.
इटलीच्या कलैब्रिया क्षेत्रातील 75 टक्क्यांहून अधिक भागांमध्ये सध्या 5 हजारांपेक्षा कमी लोक राहतात. मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्येच्या समस्येला तेंड देणाऱया इटलीच्या अनेक शहरांनी अल्प दरात घरे उपलब्ध करण्याची योजना मांडली आहे. इटलीच्या बेसिलिकाटा क्षेत्रातील लॉरेनजाना शहरात 1 युरोमध्ये घर विकले जात होते.








