इतिहासाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्या डॉ. प्राची देशपांडे यांना ‘इन्फोसिस सायन्स फाउंडेशन’तर्फे देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला. त्यांना ‘ह्युमॅनिटिज’ विभागासाठीचा पुरस्कार देण्यात आला. डॉ. प्राची देशपांडे सध्या कोलकाता येथील सेंटर ऑफ स्टडिज सोशल सायन्सेसमध्ये इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका (असोसिएट प्रोफेसर) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुढे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहासाचं शिक्षण घेतलं. त्यांनी 2002 मध्ये टफ्स विद्यापीठातून पीएचडी मिळवली. डॉ. देशपांडे यांनी अमेरिकेतल्या विविध शैक्षणिक संस्थांमधून इतिहास शिकवला. त्यानंतर त्या काही काळ कॅलिफोर्निया विद्यापीठात रूजू झाल्या. 2010 मध्ये त्या भारतात परतल्या. डॉ. देशपांडे यांनी हिस्टॉरिओग्राफी, भाषा आणि प्रांतीय ओळख अशा विषयांच्या सामाजिक तसंच सांस्कृतिक इतिहासावर संशोधन केलं. त्यांनी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केलं असून त्यांच्या ‘क्रिएटिव्ह पास्ट्सः हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया 1700-1960’ या पुस्तकात पश्चिम भारतातल्या मराठी भाषिक भागांमधल्या आधुनिक इतिहास लेखन शैलीचा उहापोह करण्यात आला आहे. तसंच महाराष्ट्राची प्रांतीय ओळख जपण्यात असणारं इतिहासाचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे. डॉ. प्राची देशपांडे यांनी पश्चिम भारताचा इतिहास जगासमोर आणण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या ‘क्रिएटिव्ह पास्ट्सः हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया 1700-1960’ या पुस्तकामुळे पश्चिम भारताचा इतिहास ठळकपणे अधोरेखित झाला आहे. त्यांच्या या पुस्तकाचं जगभरातल्या इतिहास संशोधकांनी कौतुक केलं आहे. डॉ. प्राची यांनी या पुस्तकातून इतिहासाला वेगळी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द मेकिंग ऑफ अ नॅशनलिस्ट आर्काईव्ह, लक्ष्मीबाई, झांसी अँड 1857’ हा लेख ‘जर्नल ऑफ एशियन स्टडीज’ मध्ये प्रसिद्ध झाला असून त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. त्यांचा हा लेख अनेकांनी अभ्यासला आहे. यासोबतच ‘इंडियन इकोनॉमिक अँड सोशल हिस्ट्री रिव्ह्यू’मध्ये प्रकाशित झालेला ‘द रायटरली सेल्फ : डिसकोर्सेस ऑफ लिटरेट प्रॅक्टिस इन अर्ली मॉडर्न वेस्टर्न इंडिया’ हा लेखही खूप नावाजलेला आहे. त्यांचं हे लिखाण त्यांच्या तसंच नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांना तसंच इतिहासाच्या अभ्यासकांना पथदर्शक ठरू शकतं. डॉ. प्राची देशपांडे यांनी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात दिलेलं योगदान खरंच खूप मोलाचं आहे.
Previous Articleकोळसा आयातीत 14 टक्क्यांची घसरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









