विदेशमंत्री जयशंकर यांनी सुनावले – भारतीय लोकशाहीच्या विदेशी मानांकनाचा मुद्दा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील लोकशाही ‘कमकुवत’ होत असल्याचे सांगणारे विदेशी अहवाल विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील संस्था ‘फ्रीडम हाउस’नंतर आता स्वीडिश संस्था ‘वी-डेमोक्रसी’ने भारतातील लोकशाहीच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली होती. ही चिंता म्हणजे बनवेगिरी असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
पाश्चिमात्य देश स्वतःला जगाचा स्वनियुक्त कस्टोडियन (पहारेदार) समजतात. भारतात कुणीच त्यांच्या मान्यतेची इच्छा राखत नाही, तसेच त्यांच्या पद्धतीने खेळ खेळू इच्छित नसल्याने पाश्चिमात्य देशांना पोटशूळ उठतो. याचमुळे ते स्वतःच्या हिशेबाने नियम तयार करतात, स्वतःचे निकष ठरवतात आणि स्वतःच निर्णय देतात, ही जणू जागतिक प्रक्रिया असल्याचे भासवू पाहतात अशी टीका जयशंकर यांनी केली आहे.
पाश्चिमात्य देशातील संस्था भाजपला हिंदू राष्ट्रवादी पक्ष ठरवतात, आम्ही राष्ट्रवादी लोकांनी 70 देशांना कोरोनाची लस पुरविली आहे. या पाश्चिमात्य देशांनी किती जणांना लस पुरविली हे सांगावे. यातील किती देशांनी स्वतःच्या नागरिकांना लस देण्यासह अन्य देशांच्या लोकांना लस देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे? अशाप्रसंगी हे देश कुठेच दिसून येत नाहीत. भारतात निवडणुकीवर कुणीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. पाश्चिमात्य देशांबद्दल असे म्हणता येते का असे प्रश्नार्थक विधान जयशंकर यांनी केले आहे.
चीनसोबत जशास तसे
चीनसोबत वाद अद्याप सुटलेला नसून चर्चा सुरू आहे. 2020 मध्ये भारत ज्याप्रकारे चीनला सामोरा गेला, तसे करणे 5 वर्षांपूर्वी शक्य नव्हते. मागील 5 वर्षांमध्ये पायाभूत सुविधा बळकट केल्या आहेत. सीमेवर शांतता राहिली तरच चीनसोबतचे संबंध सुरळीत राहू शकतात. चीनने मैत्रीचा हात पुढे केल्यास आम्हीही मैत्रीचा हात पुढे करणार आहोत. पण चीनने बंदूक ताणल्यास आम्ही त्याचनुसार प्रत्युत्तर देऊ असे उद्गार विदेशमंत्र्यांनी काढले आहेत.
चीनवरून क्वाडवर प्रभाव नाही
विदेशमंत्र्यांनी क्वाड म्हणजेच भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या बैठकीला चीनशी जोडून पाहण्यास नकार दिला आहे. क्वाड कुणाच्या विरोधात नसून याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. एकत्रित काम करता येण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. चीनसोबत तणाव कमी होण्यासाठी क्वाडसाठी भारताच्या प्रतिबद्धतेवर कुठलाच प्रभाव पडणार नसल्याचे जयशंकर म्हणाले.









