ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सन 2012 मध्ये केरळच्या सागरी किनारपट्टीजवळ इटालियन नौदलातील दोघांनी भारतीय मच्छिमारांची गोळय़ा झाडून हत्या केली होती. त्यावेळी या दोन्ही इटालियन्स मरीनला अटक करण्यात आली होती. इटालियन मरीन्सविरोधातील खटला 9 वर्ष चालल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाकडून हा खटला रद्द करण्यात आला आहे.
15 फेब्रुवारी 2012 रोजी मासेमारी करण्यासाठी केरळच्या अंबलापुझा किनाऱ्याजवळ केरळचे दोन मच्छिमार गेले होते. त्याचवेळी सिंगापूर ते इटलीच्या दिशेने जाणारे एक तेलाचे जहाज एनरिका लेक्सी त्यांच्या अगदी जवळ दिसून आले. एनरिका लेक्सीमध्ये 19 भारतीयांसह 34 क्रू मेंबर्स होते. याच जहाजात आरोपी इटालियन मरीन मेसिमिलियानो लातोर आणि सेल्वातोर जिरोन सुद्धा होते. त्यांनी लुटारू समजून भारतीय मच्छिमारांवर गोळय़ा झाडल्या. त्यामध्ये दोन मच्छिमाराचा मृत्यू झाला होता.
इटालियन अधिकाऱ्यांची सुटका करून घेण्यासाठी इटली सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली होती. अखेर यात इटलीचा विजय झाला. इटलीने दिलेली 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम केरळ उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालय पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई वितरित करेल. दोन्ही पीडित कुटुंबियांना प्रत्येकी चार कोटी रुपये दिले जातील, तर बोटीच्या मालकाला दोन कोटी रुपये दिले जातील.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पीडित कुटुंब नुकसान भरपाईवर समाधानी आहे आणि म्हणूनच दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात सुरू असलेली सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.