कोरोना संकटामुळे लॉकडाउनची स्थिती : मृतांचा आकडा 631 वर, शाळा-विद्यापीठांना 15 मार्चपर्यंत सुटी
वृत्तसंस्था/ मिलान, रोम
कोरोना विषाणूने चीननंतर इटलीच सर्वाधिक ग्रस्त आहे. इटलीत आतापर्यंत 10149 रुग्ण आढळून आले असून मंगळवारच्या दिवशी 168 जणांना जीव गमवावा लागला आहे. तत्पूर्वी रविवारी इटलीत 132 जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत इटलीत 631 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. 109 देशांमध्ये 1 लाख 13 हजार 255 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 20 हून अधिक देशांमध्ये 3964 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इटलीत कोरोना विषाणूच्या सकंटामुळे सरकारने सर्व शाळा आणि विद्यापीठे 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील नागरिकांना घरातच थांबण्याची सूचना केली जात आहे. इटलीत लोकांना केवळ आपत्कालीन स्थितीतच घरातून बाहेर पडू दिले जात आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी इटलीत ठिकठिकाणी तपासणी नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
300 हून अधिक केंद्रांची स्थापना
इटलीने कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व रुग्णालयांना सज्ज ठेवले आहे. तर 300 हून अधिक वैद्यकीय केंद्रांची निर्मिती करत तेथे कोरोनाच्या रुग्णांना ठेवले जात आहे.
सैन्य तैनात
मिलान, रोम, टय़ूरिन आणि सिसिलिया समवेत सर्व मोठय़ा शहरांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. सैनिक लोकांवर नजर ठेवत आहेत. इटलीत प्रवासावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करू दिला जात आहे.
मास्कचा वापर अनिवार्य
परस्परांपासून सुमारे 3.3 फूट अंतरावर राहण्याची ताकीद प्रवाशांना दिली जात आहे. मास्क आणि सॅनिटायजरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पूर्ण इटलीमध्ये मागील 15 दिवसांपासून बाजारपेठ बंद आहे. फ्लोरेन्स शहरातील दागिन्यांचा बाजार मागील 10 दिवसांपासून बंद राहिल्याने कोटय़वधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
चीन पुरविणार वैद्यकीय सामग्री
इटलीला वैद्यकीय उपकरणे, हेजमॅट ड्रेस, ग्लोव्ह्ज आणि अन्य सामग्री उपलब्ध करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. इटलीला तत्काळ आवश्यक असलेल्या सामग्रीचा पुरवठा करणार असल्याचे चीनने म्हटले आहे. इटलीचे विदेशमंत्री लुइगी डि माओ यांच्यासोबत चर्चा झाल्याचे चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी सांगितले आहे. उच्च तंत्रज्ञानयुक्त मास्क, कोरोना विषाणू संसर्गाच्या चाचणीसाठी सुरक्षात्मक पेहराव चीन पुरविणार आहे. वैद्यकीय सामग्रीसह एक मालवाहू विमान बुधवारी पहाटे इटलीसाठी रवाना झाले आहे.