कोरोनामुळे जगभरात .38721 बळी, स्पेनमध्ये एका दिवसात 849 बळी
जगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढतच चालले आहेत. 199 देशांमध्ये 799723 रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 38721 जणांना या संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर 169988 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाल्याने उपचाराची दिशा अधिक स्पष्ट होऊ लागली आहे. युरोपमध्ये इटली, स्पेन आणि फ्रान्स सर्वाधिक कोरोनाग्रस्त देश ठरले आहेत. स्पेनमध्ये एका दिवसात सवांधिक 849 तर फ्रान्समध्ये 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर स्पेनमध्ये बळींचा आकडा 8189 तर फ्रान्समध्ये 3024 झाला आहे. इटलीत आता टाळेबंदीची मुदत 12 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक 1 लाख 64 हजार 121 रुग्ण सापडले आहेत. हा आकडा चीनच्या तुलनेत (81 हजार 518) दुप्पट आहे. अमेरिकेत 3163 लोकांना जीव गमवावा लागला आहे. वॉशिंग्टनमध्ये लोकांना घरातच थांबण्याचा आदेश देण्यात आला आहे. अन्य कुठल्याही देशाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 10 लाख लोकांची चाचणी करण्यात आली आहे.
पनामात लिंगआधारित क्वारेंटाइन

पनामा येथील सरकारने लिंगआधारित क्वारेंटाईनची घोषणा केली आहे. तेथे क्वारेंटाईनसंबंधी नवा आदेश देण्यात आला आहे. तेथील महिला सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दोन तासांसाठी घराबाहेर पडून आवश्यक सामग्री खरेदी करू शकतात. तर पुरुष केवळ मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी घरातून बाहेर पडू शकतील. रविवारी कुणालाही घरातून बाहेर पडण्याची अनुमती नसणार आहे. पनामामध्ये 1075 रुग्ण सापडले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथे मागील एक आठवडय़ापासून टाळेबंदी लागू आहे.
इटलीत रुग्णसंख्या लाखावर

इटलीत रुग्णांची संख्या आता 101739 झाली आहे. तर तेथे 11591 जणांना जीव गमवावा लागला आहे. इटलीत प्रतिदिनी सरासरी 600 पेक्षा अधिक लोक मारले जात आहेत. इटलीच्या सरकारने ईस्टरपर्यंत (12 एप्रिल) टाळेबंदी वाढविली आहे. परंतु तेथे आता संसर्ग घटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सोमवारी 1648 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर रविवारी हाच आकडा 3815 इतका होता. इटलीत कोरोनाने सर्वाधिक बळी घेतले आहेत.
स्पेनमध्ये स्थिती बिकट

इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनाने सर्वाधिक हानी घडवून आणली आहे. स्पेनमधील बळींचा आकडा 7 हजार 716 वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 94417 झाली आहे. तेथील रुग्णांचे प्रमाण आता चीनपेक्षाही अधिक झाले आहे. तर स्पेनला गुणवत्ताहीन कोरोना टेस्ट किट्सची विक्री करणाऱया कंपनीची चौकशी करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या किट्सच्या चाचणीचा निष्कर्ष विश्वासार्ह नसल्याचे समोर आल्याने चीनची कोंडी झाली आहे. अशाप्रकारच्या किट्समुळे योग्य वेळेत रुग्णांचा थांगपत्ता लागत नसल्याने कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे बोलले जात आहे.
जर्मनीत 4751 नवे रुग्ण

जर्मनीत संसर्गाचे 4 हजार 751 नवे रुग्ण समोर आले आहेत. देशात आता एकूण 67051 रुग्ण झाले आहेत. तर जर्मनीत आतापर्यंत 650 जणांना जीव गमवावा लागला आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचा तपासणी अहवाल पुन्हा एकदा नकारात्मक आला आहे. मर्केल मागील दोन आठवडय़ांपासून विलगीकरणाची प्रक्रिया राबवत आहेत. मर्केला यांना लस देणारा डॉक्टर कोरोनाने ग्रस्त आढळून आला होता.
पाकिस्तानात बळी वाढले

पाकिस्तानात सोमवारी 7 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. तेथील एकूण बळींची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. तर रुग्णांची संख्या आता 1865 झाली आहे. पाकिस्तानात पंजाबमध्ये सर्वाधिक 651 तर सिंधमध्ये 627 रुग्ण आढळून आले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतातही स्थिती बिघडत चालली आहे. इराणमधून परतलेल्या नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. तेथील सरकारने अद्याप ठोस पाऊल उचललेले नाही.
इस्रायलमध्ये 4831 रुग्ण

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (70 वर्षे) आणि त्यांच्या मुख्य सल्लागारांनी स्वतःला विलग केले आहे. परंतु नेतान्याहू आणि त्यांच्या कुटुंबाचा तपासणी अहवाल सोमवारी नकारात्मक आला होता. नेतान्याहू यांच्या सहकाऱयाला कोरोनाची लागण झाली आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 4831 रुग्ण सापडले असून 17 जणांना जीव गमवावा लागला आहे. इस्रायल सरकारने कठोर पाऊल उचपल्याने संसर्ग नियंत्रणात येण्याची अपेक्षा आहे.
चीनमध्ये 3305 बळी

कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 518 जणांना संसर्ग झाला आहे. तर 3305 जणांचा मृत्यू झाला आहे. एका अहवालानुसार चीनमधील 80 टक्के बळी 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील होते. विषाणूचे उगमस्थान मानले गेलेल्या वुहान शहरात 8 एप्रिल रोजी टाळेबंदी हटविली जाणार आहे. पण त्यापूर्वीच रेल्वे आणि विमानोड्डाण सेवा सुरू करण्यात आली आहे. चीनच्या शासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.









