महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षण सोडत उद्या : इच्छुकांसह राजकीय नेत्यांचा नजरा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2020 -2015 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या नवीन सभागृहात प्रवेश करण्यासाठी तयारी केलेल्या इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांतमध्ये आपल्या हक्काच्या प्रभागात कोणत्या प्रकारचे आरक्षण पडणार? याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या सोडतीवर राजकीय भवितव्य ठरणार असल्याने अनेक इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या पाच वर्षात केलेली तयारी, कोरोनाच्या काळात केलेले कार्य यातून उमेदवारीचा दावा करणारे इच्छुक आता आपल्याला हवा तसे आरक्षण पडावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी 81 प्रभागांवरील आरक्षणाची सोडत सोमवार 21 डिसेंबर रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृहात काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता सोडतीच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. सोडतीची वेळ जशी जवळ येत आहे, तशी इच्छुक उमेदवारांमधील घालमेल वाढत आहेत. इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी पोषक आरक्षण असलेला प्रभाग मिळावा देव पाण्यात ठेवले आहेत. शहरातील गल्ली गल्लीत आरक्षणाची चर्चा आहे. आरक्षणानंतर तालीम संस्था, मंडळांना महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालमींच्या पदाधिकाऱयांचीही राजकीय नेत्यांप्रमाणे आरक्षणाच्या सोडतीवर नजर लागून राहिली आहे.
राजकीय पक्षाची गणिते सोमवारी ठरणार
81 प्रभागातील राजकीय स्थितीनुसार राजकीय पक्षांनी काही समिकरणे, गणिते मांडली आहेत. पण प्रत्यक्षात आरक्षण सोडतीनंतर प्रभागाचे राजकारण निश्चित होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा आरक्षण सोडतीवर वॉच आहे. प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
राजकीय नेत्यांची यंत्रणा कार्यरत
आरक्षण सोडतीनंतर राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षणानंतर बदलणारे राजकीय संदर्भ पाहून निर्णय घ्यावे लागणार असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांची यंत्रणा कार्यरत झाली आहे. आगामी निवडणुक काळात पालकमंत्री सतेज पाटील यांचे अजिंक्यतारा कार्यालय, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान आणि राष्ट्रवादीचे कार्यालय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे संभाजीनगर येथील निवासस्थान, माजी खासदार धनंजय महाडिक यांचा कावळा नाका येथील पेट्रोल पंप, शिवसेनचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे शनिवार पेठेतील निवासस्थानरूपी शहर कार्यालय ही राजकीय घडामोडींची प्रमुख केंद्रे असणार आहेत. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांचे शिवाजी उद्यमनगर येथील निवासस्थानही इच्छुक उमेदवारांसाठी खुले असणर आहे. आरक्षण सोडतीनंतर पुढील मतदानाच्या तारखेपर्यंत या ठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता राहणार आहे.









