लॉकडाऊनमध्ये शोधला रोजगाराचा पर्याय वडापावने तारले ! : दिवसाला होते 300 वडापावची विक्री केर येथील तरुणाचा आदर्श
तेजस देसाई / दोडामार्ग:
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाने जग हादरले. याचा परिणाम म्हणून कंपन्या विविध रोजगार देणारी आस्थापने बंद झाली आणि बेकारी वाढली. एका ‘बार अँड रेस्टॉरंट’ मध्ये कामाला असणारे आदर्श गाव केर येथील अशोक खानोलकर यांचीही नोकरी गेली. मात्र, त्यांनी आता कसं होईल? या प्रश्नाने खचून न जाता घरीच वडापाव बनविणे सुरू केले. हाच पर्याय त्यांच्या रोजगाराचे साधन बनले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये स्वतःमधील कौशल्याचा शोध घेऊन खानोलकर यांच्याप्रमाणे कार्य करण्याची गरज आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, तालुक्यात तिलारी खोऱयातील शेवटच्या टोकावर महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त केर हा गाव आहे. या गावाला लागून भेकुर्ली, मोर्ले, घोटगेवाडी हे गाव येतात. एकमेकांच्या घरगुती ते सार्वजनिक कार्यक्रमात येथील नागरिकांचा ये-जा असते. येथील युवक बऱयापैकी संख्येने गोव्यात कामानिमित्त असतात व स्वतःच्या दुचाकीने ये-जा करतात तर अन्य कामगारांस ये-जा करण्यासाठी गोवा सरकारची कदंबा बस सेवा आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गोव्यात ये-जा बंद आहे. अनेकजण घरीच आहेत. अनेकांची कामे गेली. या मधील अशोक खानोलकर हे गोव्यात बार अँड रेस्टॉरंटमध्ये कुक म्हणून काम करायचे. शिवाय एक उत्तम कुक म्हणून त्यांची परिसरातील गावात ओळख आहे. मात्र, अचानक काम गेल्याने रोजगाराची चिंता त्यांना होती. त्यांनी आपल्या केर (अवाटवाडी) येथील घरी वडा, भजी बनविण्याचे काम सुरू केले. परिसरातील लोकही घरीच होते. शिवाय हॉटेलमधून खाण्यापेक्षा ओळखीच्या माणसाकडून उत्तम चवीचे मिळत असल्याने खानोलकर यांना ’वडापाव’ अन्य पदार्थ बनविण्याच्या ऑर्डर मिळू लागल्या. आज केर-मोर्ले- घोटगेवाडी या तीन गावात मिळून ते जवळपास 350 वडापाव विक्री करतात. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबियांची त्यांना उत्तम साथ मिळत आहे. त्यांना ज्या ठिकाणी ऑर्डर असेल तिथे घरपोच देतात त्यांचे ग्राहक वाढतच आहेत.
कौशल्याचा शोध घ्यावा
खरे तर लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱया गेल्या. ज्यांच्याकडे चांगली कौशल्य असूनही ते निराशेच्या गर्तेत आहेत. त्यांनी खानोलकर यांचे उदाहरण डोळय़ासमोर ठेवून आपल्यातील कौशल्याचा शोध घेऊन व्यवसाय उभारावा हीच अपेक्षा.









